इनकमिंग बंद करा, अन्यथा काम थांबवू
By admin | Published: October 22, 2016 03:38 AM2016-10-22T03:38:43+5:302016-10-22T03:38:43+5:30
दिवा आणि पाचपाखाडी येथील नाराज शिवसैनिकांनी पक्षात इतर पक्षांतून येणाऱ्या लोंढ्यांच्या निषेधार्थ पक्षांतर केल्याची घटना ताजी असतानाच महापालिका निवडणुकीच्या
- अजित मांडके, ठाणे
दिवा आणि पाचपाखाडी येथील नाराज शिवसैनिकांनी पक्षात इतर पक्षांतून येणाऱ्या लोंढ्यांच्या निषेधार्थ पक्षांतर केल्याची घटना ताजी असतानाच महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी रात्री घेतलेल्या बैठकीत ‘यापुढे शिवसेनेत अन्य पक्षांतील नेत्यांचे इनकमिंग असेच सुरू राहिले तर आम्ही काम थांबवू,’ असा इशारा काही नाराज शिवसैनिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. यामुळे बैठकीतील वातावरण तापले व नेत्यांनीही ज्यांना नाराज व्हायचे त्यांनी जरूर व्हावे, अशा शब्दांत अन्य पक्षांतील मंडळी येण्याचे थांबणार नाही, असेच स्पष्ट संकेत दिले.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज होण्याचे आदेश शिवसैनिकांना गुरुवारी सकाळी दिल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख, गटप्रमुख, विभागप्रमुख यांची बैठक सूर्या या शिवसेनेच्या कार्यालयात झाली. पालकमंत्री शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर संजय मोरे, नरेश म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक सुरू होती. चारचे पॅनल झाल्याने प्रचार कसा करायचा, मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, मतदारांच्या याद्या कशा पद्धतीने तयार करायच्या, यासह विविध बाबींची चर्चा झाली. ‘आता कामाला लागा’, असे फर्मान यावेळी शिवसैनिकांना देण्यात आले. शिवसेनेतील अंतर्गत विरोध पहिल्याच बैठकीत उफाळून आल्याने आता येत्या काळात शिवसेना नेतृत्व पक्षातील इनकमिंगला ब्रेक लावणार की बैठकीत दिलेल्या इशाऱ्यानुसार शिवसैनिकांमधील नाराजी बाजूला सारून अन्य पक्षांतील मातब्बर मंडळींना शिवसेनेत आणून उमेदवारी देण्याची आपली कार्यपद्धती सुरूच ठेवणार, याची कुजबूज शिवसेनेत सुरू आहे.
आर्थिकदृष्ट्या बलवान उमेदवारांना तिकीट का?
बैठकीत काही निष्ठावान शिवसैनिक उभे राहिले व त्यांनी सध्या पक्षात ज्या पद्धतीने अन्य पक्षांतून मंडळी येत आहेत, उमेदवारीचे आश्वासन मिळाल्याचे सांगत आहेत, त्याबाबत नाराजीचा सूर लावला. निष्ठावंत शिवसैनिक वर्षानुवर्षे महापालिका निवडणुकीची वाट पाहत असतो. अशावेळी केवळ आर्थिकदृष्ट्या बलवान असलेले उमेदवार इतर पक्षांतून आणून त्यांना उमेदवारी दिली जाणार असेल, तर तो आमच्यावर अन्याय आहे, असे हे निष्ठावंत शिवसैनिक बोलले. दिवा, पाचपाखाडीतील घडामोडींकडे त्यांनी अंगुलीनिर्देश करीत आतातरी इतर पक्षांतील मंडळींना शिवसेनेत घेऊ नका, अन्यथा आम्ही काम करणार नाही, असा सूर लावला. त्यामुळे काही काळ बैठकीतील वातावरण तणावाचे झाले. शिवसैनिकांची इशाऱ्याची भाषा ऐकणाऱ्या नेत्यांनी मग तुम्हाला नाराज व्हायचे असेल तर व्हा, असा दम दिला, असे समजते.