वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नल बंद करा
By admin | Published: July 17, 2017 01:12 AM2017-07-17T01:12:29+5:302017-07-17T01:12:29+5:30
घोडबंदरकडे येजा करण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील सिग्नलमुळे मोठा खोळंबा होतो, हे सोमवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदरकडे येजा करण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील सिग्नलमुळे मोठा खोळंबा होतो, हे सोमवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. सकाळ, दुपार, रात्री या ठिकाणी वाहतुकीला मोठा ब्रेक लागतो. यामुळे तो बंद करावा, अशा आशयाचे पत्र महापौर मीनाक्षी शिंदे यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहे. परंतु, अद्यापही त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात आलेला नाही.
घोडबंदर मार्ग हा चारपदरी झाल्यानंतर येथील वाहतूककोंडी सुटेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली आहे. त्यामुळे या भागात चार ठिकाणी टप्प्याटप्प्याने उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ कोंडी फोडण्यासाठी याची मदत झाली. परंतु, मुंबईच्या दिशेने जाताना आणि मुंबईहून येताना कापूरबावडी येथील उड्डाणपूल सुरू झाला आणि वाहतूककोंडीत आणखीनच भर पडली. मुळात येथील उड्डाणपूल तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे उतरवण्याची घोडचूक एमएसआरडीसीकडून झाली. तो पूल पुढे विहंग हॉटेलपुढे उतरवणे गरजेचे असताना तो सिग्नलच्या आधीच खाली उतरवण्यात आला. तो कोणी खाली उतरवण्याचे ‘प्रताप’ कुणी केले, याचे आजही कोडे आहे. परंतु, त्याचे भोग आता वाहनचालकांना भोगावे लागत आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि नाशिककडून येणारी वाहतूक एकाच वेळेस वेगात येऊन या ठिकाणी असलेल्या सिग्नलजवळून येऊन थांबते. त्यामुळे थेट उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी दीड वर्षापूर्वी येथील सिग्नल ठरावीक वेळासाठी बंद ठेवून विद्यापीठाच्या आतील बाजूने येणारी आणि घोडबंदरकडून येणारी वाहतूक वळवण्यात आली होती. परंतु, कालांतराने पुन्हा तो संपूर्ण वेळेत सुरू ठेवण्यात आला. त्यामुळे या भागात आता दोन्ही बाजंूनी लांबचलांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा म्हणून ही कोंडी फोडण्यासाठी हा सिग्नल बंद करण्याची मागणी महापौरांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.