हरित शिक्षक पुरस्कार स्पर्धेत राज्यभरात ठाण्याचे तुषार सापळे अव्वल
By सुरेश लोखंडे | Published: February 26, 2024 07:34 PM2024-02-26T19:34:25+5:302024-02-26T19:34:36+5:30
द्वितीय पारितोषिक नाबर गुरुजी विद्यालय दादर येथील रूपाली देवरे आणि तर तृतीय क्रमांक क.भी देशपांडे हायस्कूल बारामती पुणे येथील सोमनाथ गावित यांनी पटकावला.
ठाणे : पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'वनशक्ती' संस्थेमार्फत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांमध्ये पर्यावरणावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे दिला जाणारा हरित शिक्षक- २०२४ स्पर्धेत यावर्षी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, शहापूर नंबर-१ शाळेतील तुषार सापळे हे शिक्षक अव्वल ठरले आहे तर द्वितीय पारितोषिक नाबर गुरुजी विद्यालय दादर येथील रूपाली देवरे आणि तर तृतीय क्रमांक क.भी देशपांडे हायस्कूल बारामती पुणे येथील सोमनाथ गावित यांनी पटकावला.
रविवार ठाणे येथील नरेंद्र बल्लाळ सभागृह पाचपाखाडी येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक रोख वीस हजार, द्वितीय क्रमांक पंधरा हजार, तृतीय क्रमांकास दहा हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप होते. पर्यावरण, वन्यजीव,जैवविविधता, नद्या, तलाव, माती, संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी आदी विषयांवर या स्पर्धेमध्ये प्रश्न विचारले गेले.
३० गुणांच्या चाळणी परीक्षेत पात्र ठरलेल्या स्पर्धकांची प्रत्यक्ष परीक्षा रविवार रोजी ठाणे येथे पार पाडली. स्पर्धेचे परीक्षण बांदोडकर विद्यालय ठाणे च्या जैवविविधता, वन्यजीव संवर्धन आणि व्यवस्थापन विभागाच्या माजी प्रमुख डॉ. पूनम कर्वे, हरित शिक्षक २०२३ च्या गतविजेत्या डॉ.राजश्री माने यांनी केले. पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी यावर्षीचे अव्वल विजेते तुषार सापळे यांना परीक्षक म्हणून सन्मान मिळणार असल्याने शहापूर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.