विद्यार्थ्यांसोबतच आता पालकांचीही घेणार शिकवणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:23 AM2018-06-18T03:23:32+5:302018-06-18T03:23:32+5:30
अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही.
- स्नेहा पावसकर
ठाणे : अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही. त्यासाठी पालक दुप्पट मेहनत करून मुलांना शिकवणीत प्रवेश घेतात. मध्यमवर्गीय पालकांची हीच परवड थांबवण्याच्या दृष्टीने सरस्वती मंदिर ट्रस्टने यंदा शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरस्वती विद्यासंकुलातच विनामूल्य शिकवणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा, यादृष्टीने पालकांचीही शिकवणी घेतली जाणार आहे.
बहुतांशी शाळांमधील सुमारे ९० टक्के विद्यार्थी खाजगी शिकवणीत जातात. अगदी शिशुवर्गातील मुलेही शिकवणीत दिसतात. त्याची कारणे वेगवेगळी असतात. काही पालकांना योग्य तितके ज्ञान नसते. काहींना मुलांसाठी वेळ नसतो. काहींच्या वस्तीमधील वातावरण अभ्यासाला पोषक नसते, तर इतर मुले जातात म्हणूनही काही पालक मुलांना शिकवणीमध्ये पाठवतात. त्यातच खाजगी शिकवण्यांची फी वर्षागणिक वाढते आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांचे आर्थिक गणित कोलमडते. आपल्या शाळेतील बहुतांशी विद्यार्थीसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, हे लक्षात घेत सरस्वती मंदिर ट्रस्टने शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान सुरुवातीला पहिली ते चौथी इयत्तेतील इच्छुक विद्यार्थ्यांची शाळेतील निवडक शिक्षक हे शाळेतच शिकवणी घेणार आहेत. शाळा सुटल्यावर किंवा आठवड्यातून शनिवार-रविवारी हे शिकवणीचे वर्ग घेतले जातील.
इच्छुक पालकांनी नाोंदणी केल्यावर जुलै महिन्यापासूनच हे अभियान सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.
>घरच्या घरी अभ्यास घेण्याच्या क्लृप्त्या शिकवणार
बदलत्या अभ्यासक्रमामुळे काही शिक्षित पालकही मुलांचा घरी अभ्यास घेणे टाळतात. अशा पालकांचीही शाळेत विशेष शिकवणी घेतली जाणार आहे. मुलांचा अभ्यास घरच्या घरी घेण्याच्या काही क्लृप्त्या, नियम त्यांना यादरम्यान समजावून सांगितले जाणार आहे.हे अभियान संस्था, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित सहभागातूनच यशस्वी होऊ शकते. पहिल्या टप्प्यातच सगळे विद्यार्थी खाजगी शिकवणीपासून दूर होणार नाहीत. मात्र, शक्य तितक्या जास्त विद्यार्थ्यांना शाळाबाह्यशिकवण्यांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे.