ठाणे जिल्ह्यात बारावीत मुलींचा निकाल नव्वदीपार; मुरबाड तालुका अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 03:37 AM2020-07-17T03:37:05+5:302020-07-17T03:37:24+5:30
यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याची या निकालावर चांगलीच छाप पडली आहे.
ठाणे : गुरुवारी दुपारी जाहीर झालेल्या बारावीच्या आॅनलाइन निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८९.८६ टक्के इतका लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील निकालात मुलींनी बाजी मारली. सर्वच तालुक्यांतील मुलींचा निकाल नव्वदीपार गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालात यंदा तब्बल पाच टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यात मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९२.८३ टक्के इतका लागला आहे.
यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याची या निकालावर चांगलीच छाप पडली आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९१ हजार ३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८१ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची संख्या ४१ हजार ७७८ आणि मुलींची संख्या ४० हजार २७ आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ८७.०५ आणि ९२.९९ टक्के इतके आहे. उत्तीर्ण झालेल्या एकूणपैकी १० हजार ६४० विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, २७ हजार ९८० विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ३८ हजार ४०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी, तर ४७८१ विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे.
विज्ञान शाखेचा
निकाल सर्वाधिक
जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल पाहिल्यास विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.६२ टक्के लागला आहे.
तर, एचएससी व्होकेशनल शाखेचा निकाल त्याखालोखाल ९०.८४ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ८९.७६ टक्के लागला आहे. सर्वात कमी कला शाखेचा निकाल ७९.७३ टक्के लागला आहे.
७९,२२६ नियमित विद्यार्थी उत्तीर्ण
यंदा जिल्ह्यातून ९० हजार १६२ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७९ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सात हजार ३३३ खाजगी विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत पाच हजार १०६ उत्तीर्ण झाले. जिल्ह्याच्या एकूण निकालात चांगलीच वाढ झाल्याने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.