ठाणे जिल्ह्यात मालमत्ता खरेदीचे सव्वादोन कोटींचे व्यवहार! दसऱ्याच्या मुहूर्तावर झाला सौदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 01:29 AM2020-10-28T01:29:53+5:302020-10-28T01:31:26+5:30
Thane Property News : दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ठिकठिकाणच्या सह दुय्यम निबंधक (रजिस्टार) कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात दोन कोटी २३ लाख ३२ हजारांचे शेत, घर,जमीन खरेदी, विक्रीचे व्यवहार रविवारी सुटीच्या दिवशी झाले.
- सुरेश लोखंडे
ठाणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर रविवारी घरांच्या खरेदीसह शेतजमीन, फार्महाऊस खरेदी - विक्रीचे एका दिवसात तब्बल दोन कोटी २३ लाख ३२ हजार ५६५ रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार ठाणे जिल्ह्यात झाले आहेत. कोरोनाचे सावट असतानाही यंदा व्यवहार उत्तम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या खरेदी, विक्रीच्या व्यवहारांतून शासनाच्या महसुलात वाढ झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ठिकठिकाणच्या सह दुय्यम निबंधक (रजिस्टार) कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात दोन कोटी २३ लाख ३२ हजारांचे शेत, घर,जमीन खरेदी, विक्रीचे व्यवहार रविवारी सुटीच्या दिवशी झाले. यंदा अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मुहूर्तावर एका दिवसात जिल्ह्यात ४६ कोटींचे स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले होते.
या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून कल्याण, डोंबिवली शहर परिसरात तब्बल ८५ लाख ८९ हजार ९७५ रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल झाले. याशिवाय या व्यवहारांच्या दस्त नोंदणीतून २२ लाख १८ हजार रुपयांची ह्यफीह्ण शासनाला प्राप्त झाली. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील कार्यालयांमध्ये ७० लाख ८८ हजार ५९० रुपये किमतीचे व्यवहार झाले आहेत. यामध्ये ५४ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि या व्यवहारांच्या नोंदणी (रजिस्टेशन) फीद्वारे १५ लाख ९० हजार ८६० रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.
ॲग्रीमेंट - लिव्ह लायसन्सची नोंदणी
ठाणे : जिल्ह्यातील या व्यवहारांची १२४ दस्त नोंदणी करण्यात आली आहे. तर १५ लिव्ह ॲण्ड लायसन्सची कागदपत्रे व सात ॲग्रीमेंटच्या दस्तांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक व्यवहार भिवंडी परिसरात झाले आहेत. त्याखालोखाल उल्हासनगर आणि शहापूर परिसराचा समावेश आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर होणाऱ्या या मोठ्या रकमेच्या खरेदी, विक्रीची शक्यता गृहीत धरून रविवारी सुटीच्या दिवशीदेखील जिल्ह्यातील काही सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवली होती. या व्यवहारांच्या दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्कच्या माध्यमातून महसूल जमा झाला.