पंचवीस वर्षांनंतर कल्याणमध्ये झाली दोन भावांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 01:29 AM2019-06-24T01:29:39+5:302019-06-24T01:29:45+5:30
छत्तीसगढमधील विलासपूर येथून बेपत्ता झालेल्या इसमाची तब्बल २५ वर्षांनंतर त्याच्या कुटुंबीयांशी भेट झाली.
कल्याण - छत्तीसगढमधील विलासपूर येथून बेपत्ता झालेल्या इसमाची तब्बल २५ वर्षांनंतर त्याच्या कुटुंबीयांशी भेट झाली. अनेक वर्षे शोध घेऊ नही तो न सापडल्याने तो घरी पुन्हा परतेल का, याची पुसटशीही आशा उरली नव्हती. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली त्याची आई त्यातच हाय खाऊ न मरण पावली. मात्र, नियतीने त्याची भेट पुन्हा कुटुंबीयांशी घडवून आणली. चित्रपटाची कहाणी शोभावी अशी ही कथा आहे, सलीम शेख (५३) या इसमाची. ‘आधार’ संस्थेने त्यांची पुन्हा आपल्या लहान भावाशी भेट घडवून आणली. चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या छटा उमटलेल्या सलीमला भेटताना भावाच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.
मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत १९९४ मध्ये सलीम घरातून अचानक गायब झाला होता. तेव्हा साधारण तो विशीत होता. अनेक ठिकाणी शोध घेऊ नही त्याचा पत्ता लागला नव्हता. त्याच्या घरच्यांनी तर आशाच सोडली होती. १९ जूनच्या संध्याकाळी सचिन शिर्के याने ‘आधार’चे अध्यक्ष विनायक आभाळे यांना फोन करून मानसिक संतुलन बिघडलेली एक व्यक्ती पश्चिमेतील बैलबाजार परिसरात रस्त्यावर पडली असल्याचे कळवले. त्यानंतर, आभाळे हे संस्थेचे सचिव अक्षय बडे यांच्यासह तेथे पोहोचले. त्या व्यक्तीने आपले नाव सलीम शेख असून छत्तीसगढ येथील असल्याचे सांगितले. एवढीच काय ती त्याच्याकडून माहिती मिळाली. त्याआधारेच आभाळे यांनी त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. दरम्यान, सलीम यांच्यावर प्राथमिक उपचार करून महात्मा फुले चौक पोलिसांच्या मदतीने त्यांना डोंबिवलीतील एका संस्थेत दाखल केले. आभाळे यांनी छत्तीसगढच्या पोलिसांकडे याबाबत संपर्क साधला. तेव्हा २५ वर्षांपूर्वी विद्यानगर, इंदिरा कॉलनी येथून एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर, दुसºयाच दिवशी आभाळे यांना छत्तीसगढ पोलिसांनी फोन करून सलीम यांचे नातेवाईक सापडल्याचे सांगून ते सलीमला घ्यायला कल्याणला येणार असल्याचे कळवले. त्यानुसार, रविवारी सकाळी सलीम यांचा भाऊ जुनेद कल्याणला आपल्या भावाला घरी घेऊ न जाण्यासाठी आला. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सलीम यांचा ताबा जुनेद यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी वृद्धत्वाकडे झुकलेल्या आपल्या भावाला पाहून जुनेद हे आपल्या डोळ्यांतील पाणी रोखू शकले नाहीत. त्यांनी आधार संस्थेचे पदाधिकारी आणि महात्मा फुले चौक पोलिसांचे यावेळी आभार मानले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी आधार संस्थेचे कौतुक करताना अशा प्रकारे काम करणाºया एनजीओ किंवा व्यक्तीला नेहमीच सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
आईची भेट होऊ शकली नाही!
पंचवीस वर्षांनंतर भावाला पाहून जुनेद यांनी सलीम यांना मिठी मारली. विलासपूर येथून ऐन तारुण्यात हरवलेले सलीम हे वृद्धत्वाकडे झुकले होते. जुनेद यांना आपला भाऊ कसा दिसतो, याची उत्सुकता होती. सलीम दिसताच त्यांच्या चेहºयात तरुणपणाच्या खुणा सापडतात का, हे काही क्षण निरखून पाहिल्यानंतर जुनेद यांनी त्यांना घट्ट मिठी मारली. आम्हा भावांची भेट झाली असली, तरी सलीम यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आई रजिया यांचे गेल्या वर्षी निधन झाल्याने मायलेकाची भेट मात्र होऊ शकली नाही, असे जुनेद यांनी सांगितले.