चोवीस तासांत साकारली तब्बल ४१५ रेखाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:36 AM2019-04-11T00:36:56+5:302019-04-11T00:36:59+5:30

दिनेश गुप्ता यांचा विक्रम : ‘लिम्का बुक आॅफ रेकार्ड’साठी प्रयत्न

In the twenty-four hours, 415 drawings | चोवीस तासांत साकारली तब्बल ४१५ रेखाचित्रे

चोवीस तासांत साकारली तब्बल ४१५ रेखाचित्रे

Next

जान्हवी मोर्ये।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : सलग २४ तासांत ४१५ रेखाचित्रे साकारून प्रा. दिनेश गुप्ता यांनी पेन्सिल आर्ट प्रकारात नवा विक्रम केला आहे. या विक्रमाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी गुप्ता प्रयत्न करत आहेत. सध्या पेन्सिल आर्ट या प्रकारात लिम्का बुकमध्ये एकही नोंद नसल्याने गुप्ता यांच्या विक्रमाची नोंद झाल्यास ही कामगिरी करणारे ते पहिलेच व्यक्ती ठरतील. लिम्का बुकमध्ये अ‍ॅक्रॅलिक रंगांत २४ तासांत २४० चित्रे काढण्याच्या विक्रमाची नोंद आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी हे रेकॉर्ड केले आहे. ५ एप्रिलला त्यांनी हे रेकॉर्ड केले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रतिभा असते. त्या प्रतिभेला लोकाश्रय मिळावा, ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. याच उद्देशातून गुप्ता यांनी आपली कला लोकांसमोर सादर करून विक्रमाला गवसणी घातली आहे. या इव्हेंटला लिम्का बुक आॅफ रेकार्डने मान्यता दिली होती. गुप्ता यांनी २४ तासांत ४१५ रेखाचित्रे काढली. त्यामध्ये सभागृहात उपस्थित नागरिक, मान्यवरांचे चेहरे, महापुरुषांचे चेहरे, नेचर आर्ट, क्रिएटिव्ह आर्ट, मॉडर्न आर्ट, एब्स्ट्रॅक्ट आर्ट आणि विविध वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. सर्व चित्रे सरल, सुबक, अद्भुत आहेत. ६बी पेन्सिलच्या साहाय्याने ए३ साइज ड्रॉइंग पेपरवर त्यांनी ही चित्रे काढली होती.


गुप्ता हे मेकॅनिकल इंजिनीअर असून नेरळच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुनील वायले, केडीएमसी महापौर विनीता राणे, माजी आमदार प्रकाश भोईर आदी उपस्थित होते.

कविता लिहिण्याचाही छंद : काही वर्षांपासून हिंदी, मराठी, इंग्रजीमध्ये लेख आणि कविता लिहिण्याचा छंदही ते वेगवेगळ्या माध्यमातून जोपासत आहेत. सलग १२ तास अव्याहृतपणे कविता लिहून त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली होती. त्याची ‘गोल्डन बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद झाली होती. लोकांशी परिचय वाढविणे, पेंटिंग बनविणे, गाणी म्हणणे, नवीन भाषा शिकणे, फोटोग्राफी आदी छंद त्यांनी जोपासले आहेत.

Web Title: In the twenty-four hours, 415 drawings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.