चोवीस तास उलटूनही हाती धागेदोरे नाहीत; कार्यकारी अभियंता हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:01 AM2019-03-24T01:01:59+5:302019-03-24T01:02:13+5:30
केडीएमसीचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी उड्डाणपुलावर चार अनोळखी व्यक्तींनी हल्ला झाला. या घटनेला २४ तास उलटूनही काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
डोंबिवली : केडीएमसीचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी उड्डाणपुलावर चार अनोळखी व्यक्तींनी हल्ला झाला. या घटनेला २४ तास उलटूनही काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून लवकरच हल्लेखोरांना अटक करू, असा विश्वास सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊ त यांनी व्यक्त केला आहे.
पाटील यांच्याकडे विविध खात्यांचा पदभार होता. त्यांनी अनेक वर्षे या ठिकाणी काम केले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे फेरीवाला पथकासंदर्भात कार्यभारही होता. तेव्हा स्थानक परिसरातील फेरीवाले तेथून हटवले होते. त्यातून हा हल्ला झाला आहे का, या दृष्टीने तपास सुरू असल्याचे राऊत म्हणाले. सध्या पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे. याबाबत त्यांचे कोणासोबत खटके उडालेत का? याचाही तपास सुरू आहे. हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले होते. हल्ला करून ते स्कायवॉकच्या पाटकर रोडवरील मधल्या जिन्याने उतरून पळाले. स्कायवॉक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ते नेमके कोणत्या दिशेला पळाले, याबाबत काहीच माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, जवळच असलेल्या बँकेच्या किंवा व्यापाऱ्यांकडील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत आहे. चौथा शनिवार असल्याने महापालिका आणि बँक बंद होती. या पार्श्वभूमीवर तपासात अडचणी येत आहेत. शिव जयंतीच्या बंदोबस्ताचा परिणामही तपासावर झाला. या हल्ल्यामागे कौटुंबिक कारण असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार आणि सहकारी तपास करत आहेत.
पाटील यांची प्रकृती स्थिर
अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. ते शुद्धीवर आले असून त्यांना बोलण्यास त्रास होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यांना भेटण्यास परवानगी नसून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पालिकेचे अभियंता प्रशांत भुजबळ यांनी सांगितले.