दोन आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:48 AM2018-10-26T04:48:41+5:302018-10-26T04:48:50+5:30
घरात चोरी करून पळालेल्या समाधान कुमावत (३१, रा. कोलशेत, तरीचापाडा, ठाणे) आणि सूरज रावत (२७, रा. कोलशेत, ठाणे) या दोघांना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात ठाणेनगर पोलिसांना यश आले आहे.
ठाणे : महागिरी कोळीवाडा भागातील प्रतिभा अहेर यांच्या घरात चोरी करून पळालेल्या समाधान कुमावत (३१, रा. कोलशेत, तरीचापाडा, ठाणे) आणि सूरज रावत (२७, रा. कोलशेत, ठाणे) या दोघांना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात ठाणेनगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे एक लाख आठ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत.
जळगावला जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून पहाटे ५.३० वाजता गाडी आहे. त्यासाठी समाधानने २२ आॅक्टोबर रोजी रात्री १२.३० वा.च्या सुमारास अहेर यांच्या घरी मित्रासोबत मुक्काम ठोकला. सकाळीच दोघेही जाणार असल्यामुळे अहेर यांनीही त्यांना राहण्यासाठी अनुमती दिली. हीच संधी साधून समाधानने पहाटे त्यांचे घर सोडण्यापूर्वी घरातील शोकेसच्या ड्रॉव्हरमधील एक लाख आठ हजारांचे सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये प्रत्येकी ३० हजारांच्या तीन सोनसाखळ्या आणि दोन अंगठ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात २४ आॅक्टोबर रोजी अहेर यांनी तक्रार दाखल केली. या दोघांपैकी समाधान हा ओळखीचा असून त्याने तीन महिन्यांपूर्वी आपल्याला फोन केला होता इतकीच जुजबी माहिती अहेर यांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी समाधानचा मोबाइल क्रमांक माहीत नसतानाही गेल्या तीन महिन्यांत अहेरना आलेल्या फोनचा तपशील तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे समाधानसह दोघांनाही २५ आॅक्टोबरला अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील संपूर्ण एक लाख आठ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. सूरजवर यापूर्वीही कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.