बिल्डरला खंडणी मागणार्या कल्याण येथील पत्रकारासह दोन आरोपी पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 05:47 PM2017-12-08T17:47:15+5:302017-12-08T17:51:32+5:30
काही आठवड्यांपूर्वीच खंडणीच्या एका प्रकरणात भिवंडी येथील पत्रकारास अटक केल्यानंतर, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी कल्याण येथील एका पत्रकारास बेड्या ठोकल्या. सायन येथील एका बांधकाम व्यावसायिकाला या पत्रकाराने खंडणीपोटी सव्वा कोटीचे चार फ्लॅट मागितले होते.
ठाणे : बदनामीची धमकी देऊन सायन येथील एका बांधकाम व्यावसायिकास सव्वा कोटी रुपयांची खंडणी मागणार्या एका पत्रकारासह दोघांना खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री ठाण्यात रंगेहाथ अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सायन पूर्व येथे गृहनिर्माण प्रकल्पाची उभारणी करणाºया एका बांधकाम व्यावसायिकाला कल्याण येथील पत्रकार सिद्धार्थ अशोक मोकळ गत काही दिवसांपासून खंडणीची मागणी करीत होता. जवळपास सव्वा कोटी रुपये किमतीचे चार फ्लॅट न दिल्यास आपल्या साप्ताहिक राजकीय दर्शनच्या माध्यमातून प्रकल्पाची बदनामी करण्याची धमकी त्याने वारंवार दिली. सुरूवातीला व्यावसायिकाने त्याच्या धमक्यांना भीक घातली नाही. त्यामुळे मोकळने त्याच्या साप्ताहिकामध्ये प्रकल्पाच्या विरोधात बातमी प्रकाशित करून, त्या बातमीचे फ्लेक्स प्रकल्पासमोर लावले. बाजारपेठेतील मंदिमुळे व्यावसायिक अगोदरच त्रस्त असताना, मोकळने केलेल्या उपद्व्यापामुळे गृहनिर्माण प्रकल्पाची विश्वासार्हता धोक्यात आली होती. मोकळचा उद्योग एवढ्यावर थांबला नाही. त्याने प्रकल्पाच्या विरोधात चित्रफित तयार करून तीदेखील ‘यू ट्युब’वर प्रसारित केली. या त्रासाला कंटाळून बांधकाम व्यावसायिकाने त्याचे कॉल रेकॉर्ड केले. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली. ठरल्याप्रमाणे व्यावसायिकाने मोकळशी वाटाघाटी करून पाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम घेण्यासाठी मोकळ आणि त्याचा भांडुप येथील साथीदार सतीश सरोज गुरूवारी रात्री खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयासमोरच असलेल्या शासकीय विश्रामगृहाजवळ आला. पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले यांनी येथे अगोदरच सापळा रचला होता. मोकळने बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणीची रक्कम स्विकारताच पोलिसांनी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सिद्धार्थ मोकळचा साथीदार सतीश सरोज हा खंडणी स्विकारताना त्याच्या सोबत होता. मोकळने व्यावसायिकाकडून पैशाची पिशवी घेतल्यानंतर सरोजच्या हातात दिली. या गुन्ह्यातील त्याचा सहभाग तपासला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.