भिवंडीत अडीच कोटींचा गुटखा जप्त; नारपोली पोलीस, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:16 AM2020-02-08T01:16:53+5:302020-02-08T01:17:20+5:30
गोदामात विविध कंपन्यांचा गुटखा साठवला होता. यानंतर अन्न प्रशासन विभाग ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधून कारवाईसाठी पाचारण केले.
भिवंडी : तालुक्यातील दापोडा येथील सिद्धिनाथ कॉम्प्लेक्समधील गोदामांवर नारपोली पोलीस व अन्न प्रशासन विभागाने शुक्र वारी एकत्रित कारवाई करत गोदामासह दोन ट्रकमध्ये असलेला दोन कोटी ५३ लाखांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू यांचा साठा जप्त केला.
नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना दापोडा येथील सिद्धिनाथ कॉम्प्लेक्समधील बी ८५ या गोदामात बेकायदा गुटखा साठविला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड व पोलीस उपनिरीक्षक आर.जे. वरकटे यांच्या पथकाने छापा घातला.
या गोदामात विविध कंपन्यांचा गुटखा साठवला होता. यानंतर अन्न प्रशासन विभाग ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधून कारवाईसाठी पाचारण केले. अन्न व औषध प्रशासनाचे पथक घटनास्थळी आले व त्यांनी कारवाई सुरू केली. अन्ननिरीक्षक शंकर राठोड यांना या गोदामसंकुलात दोन ट्रक संशयास्पद उभे असलेले आढळले. त्यांची तपासणी केली असता या ट्रकमध्येही गुटखा सापडला.
या कारवाईत दोन कोटी ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून मोहम्मद इमरान नुरु द्दीन खान, गोदाममालक अमित गोेसरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदाम व्यवस्थापक विशाल मांडवकर, नागेंद्रकुमार यादव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, १६ जानेवारी रोजी तालुक्यातील खारबाव येथे दोन कोटी ७५ लाख रु पयांचा गुटखा जप्त केला होता.