घराबाहेर खेळणा-या अडीच वर्षांच्या चिुरडीचं अपहरण करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:48 AM2018-02-26T00:48:19+5:302018-02-26T00:48:19+5:30
घराबाहेर खेळताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे मद्यपी तरुणाने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका परिसरात घडली. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करीत सहा तासांत त्याला अटक करून बालिकेची सुखरूप सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घराबाहेर खेळताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे मद्यपी तरुणाने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका परिसरात घडली. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करीत सहा तासांत त्याला अटक करून बालिकेची सुखरूप सुटका केली. संदीप शशिकांत परब (२८) असे त्याचे नाव आहे. सीसीटीव्ही कॅमेºयातून मिळालेल्या फूटेजच्या आधारे त्याला साकीनाका पोलिसांनी पकडले.
परब हा टिळकनगर परिसरात राहात असून दुकानात बर्फाची डिलिव्हरी करण्याचे काम करतो. शुक्रवारी साडे चारच्या सुमारास शिरीन फातमा तिच्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. शोध घेऊनही बराच वेळ न सापडल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी एक विशेष पथक तयार केले. पथकाने दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ज्यात शिरीनला एक तरुण उचलून नेत असताना दिसला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले.
शिरीनच्या पालकांनी परबला ओळखले. परिसरात बर्फाची डिलिव्हरी करताना त्याला पाहिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी टिळकनगर परिसरातून त्याला शिरीनसह ताब्यात घेतले.