दोन लाखांच्या खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:31 AM2021-09-09T00:31:16+5:302021-09-09T00:34:36+5:30
दोन लाखांच्या खंडणीसाठी बाळकूम येथील जेष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्याच्या कारची जबरीने चोरी करणाºया सचिन भोईर (३६, रा. शहापूर, ठाणे) आणि गणेश घाडगे (३५, रा. ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दोन लाखांच्या खंडणीसाठी बाळकूम येथील जेष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्याच्या कारची जबरीने चोरी करणाºया सचिन भोईर (३६, रा. शहापूर, ठाणे) आणि गणेश घाडगे (३५, रा. ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली आहे. त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
शहापूर येथील रहिवासी सचिन याला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी फाईल तयार करुन देण्यासाठी ठाण्याच्या ढोकाळी येथील रमेश निकम यांनी त्यांच्याकडून १९ हजार रुपये घेतले होते. परंतू, सचिनचे कर्ज मंजूर न झाल्यामुळे त्याने निकम यांच्याकडे १९ हजारांची रक्कम मागूनही त्यांनी ती परत केली नाही. त्यानंतर ३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी नाका येथील महादेव हॉटेल येथे सचिन, गणेश आणि अन्य एका अनोळखी तरुणाने संगनमत करुन निकम यांना बोलविले. तिथे त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल खेचून त्यांना स्पेन्सर हॉटेल येथे नेले. तिघांपैकी अनोळखीने त्यांच्या कारची चावी जबरदस्तीने घेऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर बँकींग अॅपद्वारे मोबाईलवर ४९९ चा रिचार्जही केला. निकम यांच्या घरी जाऊन त्यांची ११ लाखांची इरटीका कार गणेश जबरीने घेऊन आला. आता दोन लाख रुपये दे, नाहीतर तुला तुझी कार देणार नाही, असे त्यांना धमकावले. पैसे न दिल्याने सचिन आणि गणेश यांनी ‘आमचे पैसे तुझ्याकडे आहेत, असे धमकावून कबूल करण्यास सांगून तसा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर दोन लाख रुपये त्यांच्याकडे असल्याचे प्रतिज्ञापत्रही कोर्ट नाका येथे करुन मारहाण करुन त्यांची कारही घेऊन गेले. याप्रकरणी ६ सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्त जयजित सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जे. डी. मुलगीकर, पोलीस नाईक प्रशांत भुरके, हवालदार संदीप भोसले, सुरेश यादव आणि योगिराज कानडे तसेच कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने सचिनला शहापूर येथून तर गणेशला ठाण्यातून अटक केली. त्यांच्या तिसºयाही साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.