ठाण्यात वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 09:45 PM2018-09-11T21:45:22+5:302018-09-11T21:50:52+5:30
चुकीच्या मार्गाने आलेल्या दुचाकीस्वाराला हटकल्याने त्यानेच वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गिरीष अहिरराव यांना मारहाण केल्याचा प्रकार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी घडला. याप्रकरणी महेश अलगुमीनी आणि सत्यविजय सरवणकर यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : विरुद्ध दिशेने आल्याचा जाब विचारल्याने वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गिरीष अहिरराव (३५) यांच्या श्रीमुखात लगावून त्यांना शिवीगाळ करणा-या महेश अलगुमीनी आणि सत्यविजय सरवणकर यांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
अहिरराव हे सोमवारी रात्री ७.३० वा. च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेबर आंबेडकर पुतळयाजवळ वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्यावेळी चुकीच्या दिशेने आलेल्या महेश अलगुमीनी याला त्यांनी थांबविले. त्याच्यावर कारवाई करीत असतांनाच त्याने त्याचा साथीदार सत्यविजय याच्या मदतीने मोबाईलमध्ये चित्रण करण्यास सुरुवात केली. अहिरराव यांनी तसे करण्याला आक्षेप घेतल्यानंतर महेश आणि सत्यविजय दोघांनीही त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ केली. त्यांना धक्काबुक्की करीत शर्टाची कॉलर पकडून डाव्या श्रीमुखात लगावली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक ए. जी. कुंभार हे अधिक तपास करीत आहेत.
-------------------