जुने सोने देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:32 PM2021-05-27T22:32:54+5:302021-05-27T22:38:16+5:30
वापी येथील जुन्या वाड्यामध्ये सोन्याचा हार सापडला असून त्याची विक्री करण्याचा बहाणा करून चार लाखांची फसवणूक करणाऱ्या धानी अजय सोलंकी उर्फ मारवाडी (३२, रा. विक्रोळी, मुंबई) आणि किसन मारवाडी उर्फ सुनील (६०) या ह्यबंटी बबलीह्णला वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वापी येथील जुन्या वाड्यामध्ये सोन्याचा हार सापडला असून त्याची विक्री करण्याचा बहाणा करून चार लाखांची फसवणूक करणाऱ्या धानी अजय सोलंकी उर्फ मारवाडी (३२, रा. विक्रोळी, मुंबई) आणि किसन मारवाडी उर्फ सुनील (६०) या ह्यबंटी बबलीह्णला वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून ७० हजारांची रोकड जप्त केली आहे.
वागळे इस्टेट, लुईसवाडीतील रहिवासी अशोक भिरुड (५८) यांच्याशी धानी आणि किसन यांच्यासह चौघांनी ४ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या घरी भेट घेतली. त्यांना आपले नाव दीपाली आणि सुनील असे सांगितले. त्यांच्या घरी गेल्यानंतर आपण नागपूर येथील आनंद मिशन आश्रमाचे कार्यकर्ते असल्याचे सांगून त्यांचा त्यांनी विश्वास संपादन केला. वापी येथे जुन्या वाड्यात सोन्याचा हार सापडला असून त्याची विक्री करायची आहे. त्यासाठी दोन सोन्याचे मणी अशोक यांना देऊन ते त्याच हारातील असल्याचेही त्यांनी भासविले. नंतर त्यांना २७ जानेवारी आणि २ फेब्रुवारी २०२१ रोजी ठाण्यातील कोपरी येथील श्रीमॉबाल निकेतन येथे बोलावून तिथेच त्यांना हा खोटा पितळी अष्टपैलू मण्यांचा हार देऊन त्याबदल्यात चार लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी भिरुड यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. जे. वळवी यांच्या पथकाने धानी सोलंकी आणि किसन मारवाडी या दोघांना १५ मे रोजी अटक केली. त्यांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून प्रकाश मौर्या यांच्यामार्फत ५० हजार तर रुपा राठोड यांच्यामार्फत २० हजारांची रोकड हस्तगत केली आहे. त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.