शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करीत दहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: March 20, 2024 08:10 PM2024-03-20T20:10:40+5:302024-03-20T20:11:04+5:30
टेम्पो चालकाला मारहाण करीत दमदाटी: कळवा पोलिसांची कारवाई
ठाणे: शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करीत दहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या जुबेर नासीर खान (३६, रा. घाेबंदर रोड, ठाणे) आणि अतुल अहिरे (४०, रा. सहार रोड, सारगाव, अंधेरी, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. त्यांना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मुंबईच्या अंधेरीतील रहिवासी दिलसाद खान (३२) हे १९ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या
टेम्पोतून मरोळमधील उमिया जनरल स्टोअर्स या प्रविण गामी यांच्या किराणा दुकानातून ५० किलो वजनाच्या २४० गव्हाच्या गोण्या भरुन ऐरोली टोलनाका मार्गे कल्याण जेल याठिकाणी जात होते. या दरम्यान नवी मुंबईतील दिघा याठिकाणी टेम्पोचा वेग कमी झाला असतांना दोन मोटारसायकलीवरुन आलेल्या चौघांपैकी पाठीमागे बसलेल्या दोघांनी त्यांना विटावा जकातनाका याठिकाणी सोडण्याचे असल्याचे सांगत या टेम्पोमध्ये शिरकाव केला. विटाव्यामध्ये आल्यानंतर टेम्पो बाजूला थांबवून आपण शासकीय अधिकारी असून टेम्पोमध्ये भरलेल्या गव्हाच्या बिलाच्या पावत्या द्या, नाहीतर तुमच्यावर कारवाई करतो, अशी धमकी दिली.
याच कारवाईच्या धाकावर त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करीत मारहाण केली. दिलसाद यांच्या मालकाला मोबाईलववरुन फोन करण्यास भाग पाडून टेम्पोमध्ये सरकारी गहू असून त्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे सुनावले. यातून सुटायचे असल्यास तुम्हाला दहा लाखांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगत ब्लॅकमेल केले. चालकासह तुमच्यावरही कारवाई करु, असे सांगत टेम्पोचालक दिलसाद यांना टेम्पोसह अडवून ठेवले. त्याच दरम्यान कळवा पोलिसांचे पोलिस उपनिरीक्षक दीपक घुगे, हवालदार शहाजी एडके, दादा दोरकर आणि रमेश पाटील यांचे पथक गस्त घालत त्याठिकाणी आले. पोलिसांना पाहून या तोतयांनी तिथून पलायन केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवरील पथकाेन जुबेर खान आणि अतुल अहिरे या दोघांना अटक केली. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.