ठाणे महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या दाेघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Published: July 5, 2024 08:49 PM2024-07-05T20:49:23+5:302024-07-05T20:49:32+5:30

ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई : बिल्डरकडे केली मागणी

Two arrested for extorting Rs 50,000 extortion by threatening to file a complaint with the Thane Municipal Administration | ठाणे महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या दाेघांना अटक

ठाणे महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या दाेघांना अटक

ठाणे: बांधकामाची ठाणे महापालिकेत तक्रार करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या गोवर्धन हनुमान पाटील (४१, रा. डोंबिवली) आणि गणेश सुधाकर शिंपी उर्फ सन्नी (४०, रा. डोंबिवली) या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याविरुद्ध डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ठाण्याच्या दातीवली भागात राहणाऱ्या गणपत म्हात्रे यांचे मुंब्रा देवी परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच बांधकामाविरोधात ठाणे महापालिकेत तक्रार करण्याची धमकी गोवर्धन पाटील आणि त्याच्या साथीदारांनी दिली. तशी तक्रार न करण्यासाठी ५० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे म्हात्रे यांनी गोवर्धन पाटील आणि त्याच्या साथीदारांना २० हजार रुपये दिले.

परंतु, गोवर्धन हा वारंवार उर्वरित ३० हजार रुपयांची मागणी करीत असल्याने म्हात्रे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्याकडे दि. २८ जून २०२४ रोजी तक्रार केली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकाने या दोघांना खंडणीची रक्कम स्वीकारताना दि. ३ जुलै २०२४ रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास सापळा रचून खर्डी गावातील दिवा प्रभाग समिती कार्यालयाजवळ अटक केली. त्यांच्याविरोधात डायघर पोलिस ठाण्यात खंडणी उकळल्याचा भारतीय न्यायसंहिता कलम ३०८ (२), ३०८(३), ३०८(४), ३०८ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना दि. ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
....................
तर खंडणी विरोधी पथकाकडून होणार कारवाई-
अशाप्रकारे कोणी ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर नागरिकांनी त्वरित गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी केले.

Web Title: Two arrested for extorting Rs 50,000 extortion by threatening to file a complaint with the Thane Municipal Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.