गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: November 8, 2024 09:02 PM2024-11-08T21:02:56+5:302024-11-08T21:03:13+5:30
उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची उल्हासनगरमध्ये कारवाई: दारुसह चार लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गावठी दारुची दोन वाहनांमधून बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या अक्षय सिंग आणि मुनाफ शेख या दोघांना दारुबंदी कायद्यांतर्गत अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक प्रविणकुमार तांबे यांनी शुक्रवारी दिली. या दोघांकडून एक हजार ८० लीटर गावठी दारुसह चार लाख ५५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
उल्हासनगरातील फॉरवर लाईन चौक आणि वडवली गावातील अंबरनाथ उल्हासनगर रोडवर दोन वाहनांमधून गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याच आधारे कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाण्याचे अधीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक आर. व्ही. सानप, जवान
एस. बी. धुमाळ, ए. जे. शिरसाठ, के. एस. वझे आदींच्या पथकाने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास
उल्हासनगरातील फॉरवर लाईन चौकात एका टेम्पोमधून तसेच पहाटे २ वाजण्याच्या सुमारास प्रवासी रिक्षाच्या तपासणीमध्ये गावठी दारुने भरलेल्या रबरी टयूब मिळाल्या. रिक्षामध्येही सिटच्या आतील बाजूस गावठी दारुचे टयूब मिळाले. प्रत्येकी ४० लीटरच्या एकूण २७ रबरी टयूबमधून एक हजार ८० लीटर गावठी दारु ही रिक्षा आणि टेम्पोसहित जप्त केली. यामध्ये
अक्षय आणि मुनाफ दोघांना अटक केली आहे.