स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दाेघांना अटक : सात पीडित तरुणींची सुटका
By जितेंद्र कालेकर | Published: February 11, 2024 06:46 PM2024-02-11T18:46:52+5:302024-02-11T18:47:02+5:30
कासारवडवली पोलिसांची कारवाई: मोबाईलसह गर्भनिरोधक सामुग्री हस्तगत
ठाणे: स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या स्पा सेंटरच्या मालकीणीसह दोघांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी रविवारी दिली. त्यांच्या तावडीतून सात पिडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या छाप्यात मोबाईलसह गर्भनिरोधक सामुग्रीही जप्त केली आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ‘वेलनेस थाय स्पा’ या मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील आणि उपायुक्त जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, चितळसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आर. जी. वेंगुर्लेकर आदींच्या दोन पथकांनी १० फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ७ ते ९ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
याच छाप्यामध्ये पैशाच्या अमिषाने काही मुलींकडून गिऱ्हाईकांकडून मसाज आणि शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची बाब निदर्शनास आली. एका तासासाठी एका मुलीसाठी सहा हजार रुपये आणि दोन तासांसाठी बारा हजार रुपये यातील महिला दलालाकडून सांगण्यात आले. त्यानंतर बनावट गिऱ्हाईकांच्या मदतीने यातील दलाल महिलेला आणि तिच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. या धाडीतून सात पिडित तरुणींची सुटका केली आहे.
याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली लॉजच्या व्यवस्थापकासह वेटर आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लालबियाकनी लालतान्सियामा (३०, रा. मिझोराम) आणि बिलींदर सरपटा (२५, रा. वाघबीळ, ठाणे) या कर्मचाऱ्यासह दाेघांना अटक केली आहे.