ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: August 23, 2023 09:05 PM2023-08-23T21:05:23+5:302023-08-23T21:05:31+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: दोन लाख ६५ हजारांचे एमडी जप्त
ठाणे: ठाण्यातील कळवा नाका परिसरात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या जिशान जाफर सैयद (३०, रा.मुंब्रा, ठाणे) आणि आसीफ अब्दुल शेख, (३०, रा.अंधेरी पश्चिम, मुंबई ) या दाेघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ६५ हजारांची एमडी पावडर हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी बुधवारी दिली.
कळवा नाका भागात दोघेजण अमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांना मिळाली होती. त्याचआधारे या पथकाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कळवा बस स्टॉप, पान टपरीजवळील कळवा नाका येथे सापळा लावून जिशान आणि आसीफ या दाेघांना ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये जिशान याच्याकडून एक लाख ४५ हजारांची २९ ग्रॅम एमडी पावडर आणि आसीफ याच्याकडून एक लाख २० हजारांची २४ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. याशिवाय, दोन मोबाइल आणि रोकड असा दोन लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायद्यांतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दाेघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी हे एमडी काेणाकडून आणले, याचा तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.