एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: September 6, 2024 07:08 PM2024-09-06T19:08:55+5:302024-09-06T19:09:02+5:30
४७६ ग्रॅम ड्रग्जसह ९५ लाखांचा मुद्देमाल जप्त: ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एमडीएमए या पार्टी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तरबेज अबूजाफर बक्षी (विरार, जिल्हा पालघर) आणि एजाज शेर खान उर्फ पठाण (साक्रीया, प्रतापगढ, राजस्थान) या दाेघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ९५ लाख २० हजार रुपयांचे एमडी जप्त केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली.
मुंब्रा आणि डायघर परिसरात एक जण एमडी विक्री करीत असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून १ सप्टेंबर रोजी ड्रग्ज पेडलर्स तरबेज याला अटक केली. यावेळी त्याच्याकडे तब्बल ४७६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आढळले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहूल म्हस्के यांच्या पकाने हे ड्रग्ज जप्त केले. चौकशीमध्ये त्याने हे ड्रग्ज राजस्थान येथे राहणाऱ्या एजाज शेर खान उर्फ पठाण याच्याकडून खरेदी केल्याची बाब समोर आली. त्यातच पोलिसांनी दुसरा आरोपी पठाण यास विरारच्या एका हॉटेल मधून अटक केली. दोघांच्या ताब्यातून ९५ लाख २० हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अटकेतले दोघे ड्रग्ज पेडलर्स अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील अमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.