शिवाईनगरातील घरातून लाखाेंच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: September 2, 2022 10:09 PM2022-09-02T22:09:49+5:302022-09-02T22:10:32+5:30
वर्तकनगर पोलिसांची कामगिरी : चार लाख ५८ हजारांचे दागिने हस्तगत
ठाणे : शिवाईनगरातील एका घरातून चोरट्यांनी चार लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने एक महिन्यापूर्वी चोरले होते. याच चोरीतील मोजेस उर्फ मंजू राजू अर्गल (२१, रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे, मूळ रा. शिवाजीनगर गोवंडी, मुंबई ) आणि सलमान चौधरी (२६, रा. शिवाजीनगर गोवंडी, मुंबई) या दोघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून चार लाख ५८ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
शिवाईनगर येथील रहिवासी वैष्णवी आसोलकर या दि. २२ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घराला कुलूप लावून म्युझिक क्लास घेण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटातील १५ तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन हजार २५० रुपयांच्या चांदीच्या वस्तू अशा चार लाख ७० हजार २५० रुपयांच्या ऐवजाची चोरी केली होती. वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. शेट्टी, पो. उपनिरीक्षक एस. के. यादव, हवालदार फिरोज सैयद, दीपक जाधव आणि सिद्धेश्वर जामगे आदींच्या पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे मोजेस उर्फ मंजू आणि सलमान चौधरी या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ५८ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.