रवी पुजारीच्या नावाने विकासकाकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना कर्जत येथून अटक
By धीरज परब | Published: October 2, 2022 08:49 PM2022-10-02T20:49:55+5:302022-10-02T20:50:13+5:30
मीरा भाईंदरमध्ये बांधकाम व्यवसाय सह शाळा, पॅथॉलॉजी लॅब आदी व्यायवसायात असणाऱ्या दिलीप पोरवाल यांच्या डीमार्ट समोरील कार्यालयात एका चिठ्ठी द्वारे ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांचा मुलगा गौरवला ठार मारण्याची धमकी त्यात देण्यात आली होती.
मीरारोड - भाईंदरमधील बड्या विकासकाला चिठ्ठी पाठवून रवी पुजारीच्या नावाने ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि मुलासह जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने कर्जत जवळील कशेळे गावातून अटक केली आहे.
मीरा भाईंदरमध्ये बांधकाम व्यवसाय सह शाळा, पॅथॉलॉजी लॅब आदी व्यायवसायात असणाऱ्या दिलीप पोरवाल यांच्या डीमार्ट समोरील कार्यालयात एका चिठ्ठी द्वारे ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांचा मुलगा गौरवला ठार मारण्याची धमकी त्यात देण्यात आली होती. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन बिल्डर पोरवाल व मुलास पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त सदानंद दाते व उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पथके नेमली. सहायक आयुक्त अमोल मांडवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुऱ्हाडे व राहुल राख सह त्यांच्या पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही सह विविध तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून दोन आरोपींची ओळख निश्चित केली.
गुन्हे शाखेच्या पथकाने इस्टेट एजंट मोहम्मद इक्बाल मोहम्मद अली शेख ( वय ४९ ) रा. सलमा मंजील, चिमटपाडा, मरोळनाका, अंधेरी आणि लॉरेन्स लिओ चेट्टीयार रा. गजानन सोसायटी, साकीनाका, अंधेरी ह्या दोघांना रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे. धमकीची चिठ्ठी दिल्यावर हे तेथे लपून बसले होते. गुन्हे शाखा दोघांची कसून चौकशी करत असून अटक आरोपींनी रवी पुजारी याचे नाव वापरून धमकावल्याची शक्यता आहे. आरोपींचे कोणाशी लागेबांधे आहेत व या मागचे कारण पोलीस शोधत आहेत असे सूत्रांनी सांगितले.