बिटकॉईनद्वारे गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या दोघांना गोव्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:15 PM2018-08-17T22:15:58+5:302018-08-17T22:22:22+5:30
गेनबिटकॉईन कंपनीत बिटकॉईन १८ महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर दरमहा १० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणा-या टोळीपैकी चेतन पाटील आणि अमित बिर या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
ठाणे : गेनबिटकॉईन कंपनीत बिटकॉईनच्या गुंतवणूकीचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४४ लाख ५१ हजार ६०१ रुपयांची फसवणूक करणा-या चेतन पाटील (२६) आणि अमित बिर (४३) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांना १८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कल्याणच्या खडकपाडा भागातील रघुवीर कुलकर्णी यांना रवी मिश्रा आणि त्याचे साथीदार अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, सुरजसिंग लगाना, रतन मुरपानी, अमित बिर आणि चेतन पाटील यांनी गेनबिटकॉईन कंपनीत बिटकॉईन १८ महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर दरमहा १० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखविले होते. याच अमिषातून त्यांना गुंतवणुकीसाठी प्रेरित केल्याने कुलकर्णी यांनी मिश्रा आणि त्याच्या साथीदारांवर विश्वास ठेवून वेळोवेळी गेनबिटकॉईन कंपनीमध्ये २२ लाख ५९ हजारांची गुंतवणूक केली. अमित भारद्वाज याने अचानक कंपनी बंद केली. त्यामुळे दरमहा दहा टक्के परतावा देणे किंवा मुद्दल रक्कम यापैकी कोणतीही रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी रवी मिश्रासह सात जणांविरुद्ध फसवणुकीसह चिटफंड आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अमित भारद्वाज (रा. नवी दिल्ली) याला २५ जून २०१८ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहातून ताबा घेऊन अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणामध्ये २२ लाख ५९ हजार किंमतीचे २९.१ बिटकॉईन कुलकर्णी यांनी तर सात गुंतवणूकदारांनी २१ लाख ९२ हजार ६०१ रुपये किंमतीचे ३२.६० बिटकॉईन असे एकूण ६१.७ बिटकॉईनसाठी ४४ लाख ५१ हजार ६०१ रुपयांची गुंतवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात पोलिसांना हुलकावणी देणारा चेतन पाटील आणि अमित बिर या दोन्ही दलालांना १४ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गोव्यातील पणजी येथील मॅजेस्टिक हॉटेलमधून ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही बँकाचे एटीएम कार्डही त्यांच्याकडून जप्त केले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीतील इतरांचाही शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.