१६ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोघे अटकेत, आतापर्यंत नऊ जणांना अटक

By अजित मांडके | Published: October 31, 2023 04:58 PM2023-10-31T16:58:46+5:302023-10-31T16:58:59+5:30

सायबर चोरट्यांनी तब्बल १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७ रूपयांची फसवणूक केली असल्याचे आढळून आले आहे.

Two arrested in case of embezzlement of 16 thousand crore rupees, so far nine people have been arrested | १६ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोघे अटकेत, आतापर्यंत नऊ जणांना अटक

१६ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोघे अटकेत, आतापर्यंत नऊ जणांना अटक

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी तयार करून त्या माध्यमातून संस्था सुरु करून २४१ बँक खात्यातून तब्बल १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७ रुपयांचा गैरव्यवहार करणारे आणखी दोघे आरोपी अटक करण्यात आले आहेत. या प्रकरणात सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाने सोमवारी दोघांना अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात ९ जणांना अटक झाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे भुपेश अगरवाल (३८) आणि महेंद्र जैन (३४) अशी आहेत. या प्रकरणात त्यांचा नेमका सहभाग कसा होता, याचा तपास आता पोलीस घेत आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात कार्यालय असलेल्या पेगेट इंडिया कंपनीचे सॉफ्टवेअर हॅक करून काही अज्ञात सायबर चोरट्यांनी कंपनीच्या खात्यातून तब्बल २५ कोटी रुपये वळते केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला होता. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सायबर चोरट्यांनी नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्टेशन रोड ठाणे या पत्त्यावर बँक दस्तवाज व विविध नोटराईज्ड भागीदारी करारनामे बनवल्याचे उघड झाले आहे.

मिळून आलेल्या दस्तावेजाच्या पडताळणीतून या सायबर चोरट्यांनी तब्बल १६ हजार १८० कोटी ४१ लाख ९२ हजार ४९७ रूपयांची फसवणूक केली असल्याचे आढळून आले आहे. या रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठविल्याचे देखील तपासातून समोर आले. या सायबर चोरट्यांच्या टोळीने देशभरातील अनेक बड्या कंपन्यांचे अशाच प्रकारे सॉफ्टवेअर हॅक करून मोठा आर्थिक फ्रॉड केल्याचे या प्रकरणाच्या तपासातून समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी आता पर्यंत सात जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता आणखी दोघे अटक करण्यात आले आहेत. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two arrested in case of embezzlement of 16 thousand crore rupees, so far nine people have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.