ठाण्यातील मजूर ठेकेदारावरील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: September 18, 2022 09:10 PM2022-09-18T21:10:20+5:302022-09-18T21:10:29+5:30
बांधकामासाठी मजूर ठेका मिळविण्यावरुन वाद
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड येथील गोळीबार प्रकरणी निखील यादव उर्फ नाक (३१, रा. लक्ष्मी चिरागनगर, ठाणे) आणि अविनाश सखाराम मौर्य उर्फ आंबट (२३, रा. कोकणीपाडा, उपवन, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने अटक केल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. बांधकामाच्या ठिकाणी माथाडी कामगारांचा मजूर ठेका मिळविण्यावरुन हा वाद उफाळून आला होता.
घोडबंदर रोड परिसरात राहणारे गणेश कोकाटे हे कामगार पुरविणारे ठेकेदार (माथाडींचे लेबर कॉन्ट्रॅक्टर) आहेत. ते १७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मित्र सचिन पाल याच्यासह त्यांच्या मोटारकारने काल्हेर येथून घोडबंदर रोडवरील माजीवडा ब्रिजच्या खाली आले होते. त्यांना लोढा आयटी पार्क येथील माथाडी कामगार पुरविण्याचा ठेका मिळाला होता. याच रागातून त्यांचा खून करण्याच्या उद्देशाने माजीवडा येथील गोल्डन डाईज नाक्यावर ब्रिजच्या आडोशाला गणेश इंदूलकर, नितेश शिंदे, अक्षय कारंडे उर्फ कालू, निखील यादव उर्फ नाकू आणि अविनाश उर्फ आंबट हे उभे होते. कोकाटे यांची कार त्याठिकाणी आली असता एका स्कूटरवरुन आलेल्या या टोळक्याने त्यांची कार अडवली.
त्यापैकी दोघांनी कारवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. सुदैवाने, या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला होता. चितळसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या गोळीबारातील निखील आणि अविनाश हे दोघे आरोपी चिरागनगर भागात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने दोघांनाही सापळा लावून चिरागनगर भागातून अटक केली. त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.