रेल्वेतून महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणीसह दाेघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: August 1, 2024 11:41 PM2024-08-01T23:41:00+5:302024-08-01T23:41:12+5:30
आठ तोळ्यांचे दागिने केले हस्तगत
ठाणे: महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या एका तरुणीसह अमाेल कानडे अशा दाेघांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून १३ गुन्हे उघड झाले. त्यातील १२ गुन्ह्यांतील आठ तोळे दागिन्यांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. महिलांचे दागिने चोरीसाठी ती रेल्वेस्थानकातील महिलांच्या मध्य भागातील डब्याची निवड करायची. तिच्या याच ‘एमओबी’मुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनेक दिवसांपासून ठाणे रेल्वेस्थानकात महिला प्रवाशांच्या डब्याजवळ महिलांचे मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी त्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक गणेश नावकार, पोलिस उपनिरीक्षक संजय मडव, हवालदार दत्तात्रय राठोड, हवालदार साक्षी सावंत, मीरजावेद नदाफ, राकेश गोसावी, हर्षद गायकवाड, नितीन सरवदे, अक्षय रणसिंग आणि अमोल मोरे यांचे विशेष पथक तयार करून गुन्ह्यांचा तपास सुरू केला हाेता. याच पथकाने फलाटांवरील सीसीटीव्ही तपासले. मात्र आरोपीचा ठाव-ठिकाणा लागत नव्हता. गेल्या २० दिवसांपासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवून होते. दुसारे यांच्यासह त्यांच्या पथकांनी चोरीच्या प्रकाराचा आणि घटनास्थळाचा आढावा घेतला. चाेरीचे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या राखीव डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार या पथकाने पाळत ठेवून एका २६ वर्षीय तरुणीला दि. २५ जुलै २०२४ राेजी ताब्यात घेतले. तिला ‘बाेलते’ केल्यानंतर तिने सर्वच चाेऱ्यांचा घटनाक्रम सांगितला.
रेल्वे पोलिसांची कारवाई
चाैकशीमध्ये पोलिसांनी तिच्याकडून पाच लाख चार हजार ३०० रुपयांचे ७७.२४० मिली ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले. तिच्याकडून एका प्रकरणाव्यतिरिक्त सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिच्याच चाैकशीमध्ये तिने चाेरलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावणारा तिचा साथीदार अमाेल कानडे यालाही दि. ३१ जुलै राेजी अटक केली. गुन्हा करण्यासाठी ही महिला लोकलचा महिला राखीव मधला डबा निवडत असल्याचे लक्षात आल्याने त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून या गुन्ह्याची उकल केल्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.