खंडणीसाठी मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक, पवई पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 08:54 PM2017-11-14T20:54:21+5:302017-11-14T20:57:43+5:30
मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या १० वर्षाच्या मुलाची भार्इंदरच्या आझादनगर भागात महापालिका मैदानात आणून हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
मीरारोड : मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण केलेल्या १० वर्षाच्या मुलाची भार्इंदरच्या आझादनगर भागात महापालिका मैदानात आणून हत्या केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
पवई साकी विहार मार्गावर तुंगा गावातील करुणानगर मध्ये राहणारे बबलु सिंग यांचा १० वर्षांचा मुलगा रितेश हा रविवार १२ नोव्हेंबर रोजी दुपारपासून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.
बबलु यांचा सख्खा चुलत भाऊ संतोष सिंग सोबत काम करणारा अमर सिंग (२०) याने त्याला खेळण्यासाठी म्हणून नेले होते. पण श्रीराम मात्र मुलाला आपण घरा जवळच सोडले असा कांगावा केला. दरम्यान पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये रितेशला घेऊन जाताना अमर व सोबत असलेला लालु ननकु सिंग (२१) रा. भार्इंदर हे दोघे आढळून आले.
विशेष म्हणजे मुलाला शोधताना अमर देखील नातलग व पोलीसां सोबतच होता. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लालु सोबत मिळून रितेशची हत्या केल्याचे कबूल केले. आज मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास पवई पोलिसांच्या पथकाने नवघर पोलिसांच्या मदतीने आझाद नगर येथील महापालिकेच्या मैदानात टाकलेला रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला.
लालु हा भार्इंदर येथे स्टील बफिंग कारखान्यात काम करतो. अमर देखील त्याच्या सोबतच भार्इंदर येथे काम करायचा.
अमरचे बबलुच्या घरी येणे जाणे होते. त्याने बबलुला पैसे मोजताना पाहिले होते. त्यातुनच रितेशचे अपहरण करुन बबलुकडून मोठी रक्कम उकळण्याचे त्याच्या डोक्यात आले. त्याने लालुला सोबत घेतले.
रितेशचे अपहरण केल्यावर त्याला रीक्षाने अंधेरी रेल्वे स्थानक व तेथुन भार्इंदर येथे आणले. परंतु बबलूने अमर याला फोन करुन रितेश कुठे असल्या बद्दल विचारणा केल्याने अमर हा हादरला. त्यातुनच अमर व लालुने भार्इंदरच्या आझाद नगर मधील पालिका मैदानात काळोख व झाडी असल्याने तेथे त्याची गळा दाबून व दगड मारुन त्याची हत्या केली.
महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुसरी हत्या
सदर मैदान हे महापालिकेच्या मालकीचे असून येथे भंगाराची गोदामे, झोपडया आदी अतिक्रमण झाले आहे. तर काही भागात झाडी वाढली असुन अंधार असतो. त्यामुळे उनाड, गर्दुल्ले आदींचा राबता असतो. एक वर्षापूर्वी याच भागातील एका ६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. स्थानिक नगरसेविका तारा घरत यांनी वारंवार पत्र देऊन, धरणं धरुन अतिक्रमण हटवा व मैदान विकसीत करण्याची मागणी चालवली होती. पण पालिकेने सातत्याने दुर्लक्षच केले.