तेलंगणामधून ठाण्यात गांजाची तस्करीसाठी आलेल्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 09:59 PM2021-03-10T21:59:33+5:302021-03-10T22:01:58+5:30
तेलंगणा राज्यामधून ठाण्यात गांजाच्या तस्करीसाठी आलेल्या अनिल टप्पानिल (२८, रा. नारायणाखेडा, तेलंगणा) आणि सुभाष रामचंद्रय्या गुरुगुला (४३, रा. गड्डीपेढापूर, तेलंगणा) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तेलंगणा राज्यामधून ठाण्यात गांजाच्या तस्करीसाठी आलेल्या अनिल टप्पानिल (२८, रा. नारायणाखेडा, तेलंगणा) आणि सुभाष रामचंद्रय्या गुरुगुला (४३, रा. गड्डीपेढापूर, तेलंगणा) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ४० हजारांचा १२ किलोचा गांजा हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील कॅसलमिल नाका, अभिरुची बस थांबा येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव , संदीप चव्हाण आणि उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने ९ मार्च रोजी कॅसलमिल भागात सापळा लावून अनिल आणि सुभाष या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्यांच्याकडून ११.९५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. त्यांनी बेकायदेशीररित्या हा गांजा तस्करीसाठी आपल्या कब्जामध्ये बाळगल्या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही १३ मार्च २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सरक हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.