ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक: साडे पाच लाखांचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:29 AM2021-09-15T00:29:18+5:302021-09-15T00:31:11+5:30
गांजाची तस्करी करणाऱ्या रेश्मा शहा (३६, रा. शिवाजीनगर, ठाणे) आणि अभिषेक जगदाळे (३५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गांजाची तस्करी करणाऱ्या रेश्मा शहा (३६, रा. शिवाजीनगर, ठाणे) आणि अभिषेक जगदाळे (३५, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून ४४ किलोचा पाच लाख ६६ हजारांचा गांजा हस्तगत केला आहे.
खारेगाव टोलनाका येथील रस्त्यावर एक महिला तिच्या साथीदारासह गांजा विक्रीसाठी रिक्षातून येणार असल्याची ह्यटीपह्ण खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत भुर्के यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, जमादार संजय भिवणकर, हवालदार कल्याण ढोकणे, संदीप भोसले, भुर्के, संदीप भांगरे आणि प्रेरणा जगताप आदींच्या पथकाने सापळा रचून रिक्षा चालक अभिषेक आणि रेश्मा या दोघांना रिक्षासह ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांच्याकडून ४४.१५ किलोचा पाच लाख ६६ हजार १०० रुपयांचा गांजा जप्त केला. दोन्ही आरोपींना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी हा गांजा अहमदनगर जिल्हयातून आणल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. हा गांजा कोणाकडून आणला तो कोणाला विक्री करणार होते? याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप भोसले यांनी सरकारतर्फेकळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.