चरस तस्करीसाठी आलेल्या दोघांना ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:55 PM2021-01-27T23:55:23+5:302021-01-27T23:59:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : चरस या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या समीर शेख (२५, रा. चेंबूर, मुंबई) आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चरस या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या समीर शेख (२५, रा. चेंबूर, मुंबई) आणि संतोष प्रसाद (४२, रा. चेंबूर) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचे चार लाख पाच हजारांचे चरस जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील कोरम मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर दर्यासागर हॉटेलजवळ दोघेजण अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची ‘टीप’ गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने २५ जानेवारी रोजी या परिसरात सापळा लावून समीर आणि संतोष या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये तब्बल दोन किलो ७०० ग्रॅम इतका चरस आढळून आला. चरस जप्त करुन या दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना २९ जानेवारीपर्यन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.