ठाण्यात चरसची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक: सव्वा तीन कोटीचे चरस हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 07:48 PM2020-09-09T19:48:10+5:302020-09-09T20:01:25+5:30
कळवा, खारेगाव टोलनाका मार्गे एका लाल रंगाच्या ट्रकमधून ७० ते ८० किलोचा चरस मुंब्रा भागात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने खारेगाव टोलनाका येथे एका ट्रकमधून मंगळवारी सव्वा तीन कोटींच्या चरससह दोघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाºया दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून ६५ किलो २१४ ग्रॅम वजनाचे तीन कोटी २६ लाख सात हजारांचे चरस चरस जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी बुधवारी दिली.
कळवा, खारेगाव टोलनाका मार्गे एका लाल रंगाच्या ट्रकमधून ७० ते ८० किलोचा चरस मुंब्रा भागात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार, सहायक पोलीस निरीक्षक मिलीन पिंगळे, उपनिरीक्षक गिरीश गायकवाड, संतोष धाडवे, जमादार तडवी, पोलीस हवालदार सोनवणे आणि पोलीस नाईक शिरोसे आदींच्या पथकाने ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे सापळा लावला. याच सापळयाच्या वेळी संशयित ट्रक त्याठिकाणी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास आला. या ट्रकमधील चालक आणि क्लिनरकडे या पथकाने केलेल्या चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, ट्रकमध्ये केलेल्या कौशल्यपूर्ण तपासणीमध्ये ६५ किलो २१४ ग्रॅम वजनाचे प्रतिबंधित अमली पदार्थ अर्थात चरस आढळले. या कारवाईत ट्रकसहित तीन कोटी ५१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी हे चरस कोणाकडून आणले? त्याची ते कोणाला विक्री करणार होते? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या आणखी काही साथीदारांनाही अटक केली जाणार असल्यामुळे या दोन्ही आरोपींची नावे उघड करता येणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी सांगितले.