२४ हजारांची लाच स्विकारतांना वसईतील तलाठयासह दोघे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 07:31 PM2018-01-08T19:31:43+5:302018-01-08T19:38:27+5:30
एका खासगी व्यक्तीच्या मदतीने ४० हजारांची मागणी करुन २४ हजारांची लाच स्विकारणाºया तलाठयाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
ठाणे : जागेच्या फेरफार नोंदी करण्यासाठी वसईतील कामण गावातील तलाठी गणेश पाटील (५३) आणि खासगी व्यक्ति कुंदन बरफ (३०) यांना २४ हजारांची लाच स्विकारतांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वसईतील एका जागेच्या मालकाच्या फेरफार नोंदी करण्यासाठी संबंधित तक्रारदाराने तलाठी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. त्यासाठी या तक्रारदाराकडे त्यांनी ४० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन ८ जानेवारी २०१८ रोजी दुपारच्या सुमारास पाटील आणि बरफ या दोघांनाही ४० हजारांपैकी २४ हजार रुपयांची लाच स्विकारतांना या दोघांना उपअधीक्षक अंजली आंधळे यांच्या पथकाने अटक केली. तक्रारदार यांच्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, तलाठी पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच आधारे लावलेल्या सापळयामध्ये २४ हजारांची लाच स्विकारतांना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टा्रचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपअधीक्षक आंधळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.