सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरी करणा-या सराईत चोरट्यासह मीरा रोडमधील दोघा साथीदारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 08:38 PM2017-11-16T20:38:00+5:302017-11-16T20:38:39+5:30
दिवाळीची संधी साधून दिल्लीवरून येऊन मीरा-भार्इंदरमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरी करणा-या सराईत चोरट्यासह मीरा रोडमधील दोघा साथीदारांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली
मीरा रोड - दिवाळीची संधी साधून दिल्लीवरून येऊन मीरा-भार्इंदरमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरी करणा-या सराईत चोरट्यासह मीरा रोडमधील दोघा साथीदारांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. ७ गुन्हे उघड झाले असून, सुमारे साडेतीन लाख रुपयांचे चोरीचे सर्व ९ दागिने हस्तगत केले आहेत. यातील अजय उर्फ भिक्कू गेंडा हा सराईत गुन्हेगार मात्र हाती लागला नसून दिल्लीच्या विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर तब्बल ७८ गुन्हे दाखल आहेत.
दिवाळीमध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने गळ्यात खरे दागिने घालतात. या संधीचा फायदा उचलत १५ ते १८ आॅक्टोबर या दिवाळीच्या तीन दिवसांत मीरा भार्इंदरमध्ये दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी खेचून पळणा-या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.
ऐन सणासुदीत सोनसाखळी चोरांनी घातलेल्या उच्छादामुळे भीतीचे वातावरण होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी सोनसोखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दल पोलीस ठाण्याच्या प्रभारींना गुन्हे रोखण्यासह आरोपींना अटक करण्यासाठी तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. दरम्यान मीरा रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक जाधव सह विजय ब्राह्मणे, पवार, केंद्रे, मणियार, परदेशी यांना सोनसाखळी चोरीप्रकरणी तपास करताना चोरट्यांनी वापरलेल्या नवीन टीव्हीएस आपाची दुचाकीचे फुटेज मिळाले होते.
दुचाकीची प्रादेशिक परिवहन खात्याकडे नोंदणी झालेली नसल्याने पोलिसांनी शहरातील दुचाकी विक्रेत्यांकडे जाऊन चौकशी केली व सदर मॉडेलच्या दुचाकी खरेदी केलेल्या खरेदीदारांची यादी तयार केली. त्यात चोरीमधली दुचाकी ही विमल राजमल सिंग (३८) रा. न्यु म्हाडा वसाहत, शांती गार्डन, मीरा रोड यांच्या नावाने खरेदी केल्याचे समोर आले.
विमल याला ताब्यात घेतल्या नंतर चौकशीत मावस भाऊ आकाश केशवदेव सिंग (२४) रा. पुनम पॅरेडाईज अपार्टमेंट, पूनम गार्डन, मीरा रोड याने खरेदी केल्याचे सांगितले. आकाशला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली असता त्याने सख्खा मावस भाऊ आकाश जगदीश लाल (२३) रा. शहाबाद डेरी, दिल्ली याला सोनसाखळी चोरीसाठी दिल्लीवरून बोलवले होते व त्याच्या सोबत भिक्कू गेंडादेखील असल्याचे पोलिसांना समजले.
आकाश लाल याला आपले नातेवाईक मीरा रोड पोलिसांच्या ताब्यात असल्याचे कळल्याने तो व भिक्कू दोघेही पसार झाले. मीरा रोड पोलिसांच्या पथकाने तीन वेळा आरोपींच्या शोधासाठी दिल्ली गाठली. अखेर दिल्ली पोलिसांच्या मदतीने आकाश लाल याला अटक झाली. त्याने त्याच्या परिचिताकडे चोरीच्या ९ सोनसाखळ्या ठेवून लाख - दोन लाख उसने घेतले होते. पोलिसांनी त्या नातलगांकडून सर्व चोरीचे दागिने जप्त केले. आकाश लाल याने दिल्लीतसुद्धा चो-या केल्या असून त्याला कधी अटक झालेली नाही.
तर दुचाकी चालवण्यात तरबेज असलेला अजय उर्फ भिक्कु गेंडा (३०) रा. दिल्ली हा मात्र अजुन फरार आहे. दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यात भिक्कुवर सोनसाखळी चोरी आदीचे तब्बल ७८ गुन्हे दाखल आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी त्याने पहिली चोरी केली. दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांसह अन्य चार पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. आकाश सिंग याच्याकडे दुचाकी खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रं नसल्याने त्याने विमल याला सांगीतले होते. त्यामुळे विमलने आपल्या कागदपत्रांच्या आधारे आकाशला दुचाकी खरेदी करण्यास मदत केली. परंतु स्वत:ची कागदपत्रं देणं विमलला चांगलच महागात पडलं. या आरोपींनी दिवाळीच्या ३ दिवसात शहरात ७ गुन्हे केले होते. ते सर्व उघड झाले आहेत. आरोपी सद्या नया नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर भिक्कुचा शोध आम्ही घेत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगीतले.