ठाण्यात वाहनांच्या बॅटऱ्या चोरणा-या दुकलीला अटक: सात बॅट-या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:47 PM2018-12-11T21:47:18+5:302018-12-11T21:55:07+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून वागळे इस्टेट पारपत्र कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅट-या चोरीस जात होत्या. याप्रकरणी एका सीसीटीव्हीच्या आधारे तजुद्दीन खान या चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी अटक केली.
ठाणे: वागळे इस्टेट भागात उभ्या असलेल्या वाहनांमधील बॅट-या चोरणा-या टोळीपैकी तजुद्दीन खान (२१, रा. श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे ) याला वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून ४२ हजारांच्या सात बॅट-या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
वागळे इस्टेट भागातील जुने पारपत्र कार्यालयाच्या मागील रोड क्रमांक आठ येथे उभ्या असलेल्या संतोष निकम (रा. जयमहाराष्टÑनगर, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्या ट्रकच्या २४ हजारांच्या दोन बॅट-या ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी चोरी केल्या होत्या. निकम यांच्यासह अनेकांच्या वाहनांच्या बॅट-यांची चोरी झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात शोध पथकाचे उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांचे पथक गस्त घालीत होते. त्यावेळी खब-यांनी दिलेल्या माहितीच्या तसेच सीसीटीव्हीच्या आधारे खानला ९ डिसेंबर रोजी अटक त्यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासून वागळे इस्टेट परिसरातील वाहनांच्या बॅट-या चोरीस जात होत्या. त्याच्या अटकेमुळे येथील वाहन चालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्याने दोन गुन्ह्यांची कबूली दिली असून त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? बॅट-या विक्रीसाठी तो कोणाची मदत घेत होता? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पठाण यांनी सांगितले.-