भिवंडीत दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:24 PM2020-09-18T15:24:55+5:302020-09-18T15:25:04+5:30
दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात यश मिळविले आहे.
भिवंडी - भिवंडी शहरात कोरोना व लॉकडाऊन काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवू लागल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. शांतीनगर पोलीस ठाणे क्षेत्रात असंख्य दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी वेगवेगळी पथके नेमून क्षेत्रात गस्त वाढवली असता दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात यश मिळविले आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक भिका भवर यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून माहिती मिळवून जरार मुजफर अन्सारी ( वय 22 , रा.नदिनाका ) यास ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता शांतीनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद असलेल्या MH 04 HT 1863 - शाईन , MH 04 KJ 3273 - बर्गमेन, MH 46 AT 8986 - स्प्लेनडर , MH 04 JG 4680 - स्प्लेनडर अशा 1 लाख 25 हजार रुपयांच्या चार दुचाकी त्याच्याकडून जप्त केल्या आहेत.
तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी यांच्या पथकाने गस्तीदरम्यान सद्दाम हुसेन याकूब अन्सारी, ( वय 28 रा.संगमपाडा ) यास हटकले असता संशय बळावल्याने त्याची चौकशी केली असता त्याची दुचाकी चोरीची आढळून आली. त्यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्याकडून MH 04 GL 4291 - ऍक्टिव्हा, MH 04 JL 8973 - शाईन अशा 45 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात यश मिळविले आहे. एकूण 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात पोलीस पथकांनी यश मिळविले असून, दोन्ही दुचाकी चोरांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.