रेमडेसिविरचा काळा बाजार करणारे ते दोघे न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:36+5:302021-04-17T04:39:36+5:30
ठाणे : ठाण्यात रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या आतीफ फरोग अंजूम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर ...
ठाणे : ठाण्यात रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या आतीफ फरोग अंजूम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. भिवंडी) या दोघांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने त्यांना अलीकडेच अटक केली होती.
ठाण्यातील इंटरनिटी मॉल येथे आतीफ आणि प्रमोद हे दोघेही रेमडेसिविरच्या विक्रीसाठी १० एप्रिल रोजी आले होते. ते इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाला एका सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने या दोघांनाही सापळा रचून अटक केली होती. एका इंजेक्शनची ते पाच हजारांमध्ये विक्री करीत होते. अंजूम हा ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे मदतनिसाचे काम करतो. हे कोविड सेंटर चालविण्याचा ठेका असलेल्या ओम साई आरोग्य केअर या कंपनीने त्याला ब्रदर या पदावर नोकरीवर घेतले होते. महिना ३५ हजार वेतन असतानाही त्याने याच हॉस्पिटलमधील १६ इंजेक्शन मिळवून त्यांची बाहेर पाच हजारांमध्ये विक्री सुरू केली होती. त्याच्याकडून १६ इंजेक्शन जप्त केली आहेत, तर त्याचा साथीदार प्रमोद याच्याकडून पाच इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.
अंजूम याची या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच नेमणूक असल्यामुळे त्याने या इंजेक्शनचा काळा बाजार करण्यास सुरुवात केली. या दोघांनाही १० एप्रिल रोजी अटक केली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणुकीसह जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला ११ ते १६ एप्रिल या काळात त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती. याच कोठडीची मुदत शुक्रवारी (१६ एप्रिल रोजी) संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यांना आणखी पोलीस कोठडीची मागणी खंडणीविरोधी पथकाने ठाणे न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली. पोलीस कोठडीऐवजी त्यांना ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश ठाणे न्यायालयाने दिला. आता या प्रकरणात अन्यही कोणती टोळी सक्रिय आहे किंवा कसे? याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.