अल्पवयीन मुलाची हत्या करणारे दोघे सख्खे भाऊ अटकेत
By अजित मांडके | Published: March 30, 2024 07:46 PM2024-03-30T19:46:05+5:302024-03-30T19:46:20+5:30
अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न
ठाणे : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न फसल्याने त्याची हत्या करणाºया सख्या भावांना ठाणे शहर पोलिसांच्या शीळ डायघर पोलिसांनी अटक केली. रमजान मोहम्मद कुददुस शेख (२०) आणि त्याचा मोठा भाऊ मोहम्मद आझाद कुददुस शेख (30) असे अटकेतील भावांची नावे असून त्यांना येत्या २ एप्रिल पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती शनिवारी ठाणे शहर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हत्या झालेला अल्पवयीन मुलगा २५ मार्च रोजी घरातून खेळण्यास बाहेर गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी घरी परतला नसल्याने त्याच्या आईने २६ मार्च पोलीस ठाण्यात धाव घेत, तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचदरम्यान नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडीवली किरवली गावाजवळील ओढ्यातील पाण्याच्या डबक्यात हातपाय बांधलेल्या व डोक्यास जखमा असलेल्या एक बालक मृतावस्थेत आढळून आला. त्याची ओळख पटल्यानंतर शीळ डायघर, मुंब्रा,कळवा गुन्हे प्रकटीकरण या पथकांनी सखोल तपास करत, दोघांना २७ मार्च रोजी अटक केली. तसेच त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली. रमजान याने मयत याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. तसेच त्याला मयत मुलाने विरोध केल्याने रमजान याने दगडाने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर कपड्याने गळा आवळून हत्या केली. तसेच भाऊ मोहम्मद याच्या मदतीने हात पाय बांधून त्याला ओढ्याच्या डबक्यात फेकून पळ काढला होता. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.