दोन भावांचा सख्या बहिणींशी लग्नाचा बनाव चौघांना पोलीसांनी केले गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 09:58 PM2019-03-01T21:58:19+5:302019-03-01T22:01:24+5:30
भिवंडी : जेष्ठ मुलाचे लग्न झालेले असताना देखील केवळ मुलींच्या मालमत्तेवर डोळा ठेऊन मुंबई कांदीवली येथील दबडे कुटुंबीयांनी संगनमताने ...
भिवंडी : जेष्ठ मुलाचे लग्न झालेले असताना देखील केवळ मुलींच्या मालमत्तेवर डोळा ठेऊन मुंबई कांदीवली येथील दबडे कुटुंबीयांनी संगनमताने शहरातील सामाजीक महिला कार्यकर्तीच्या दोन मुलींशी साखरपुडा केला. तसेच लग्नासाठी हुंडा म्हणून २ लाख रु पये रोख व दीड लाख रूपयांचे पाच तोळे दागीने असा साडेतीन लाखांचा ऐवज हडप करून लग्नास नकार दिला.या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दबडे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आईवडीलांसह दोन्ही भामट्या मुलांना गजाआड केले आहे.
गणेश बाळासाहेब दबडे (२४), विकास दबडे (२२), वनिता दबडे ( ४५) व बाळासाहेब तातोबा दबडे (५२) असे अटक केलेल्या दबडे कुटूंबीयांची नांवे असून ते मुळचे मिरज येथील रहाणारे असून सध्या ते मुंबईतील कांदिवली येथील हनुमान नगर मध्ये रहात आहेत. त्यांनी संगनमताने शहरातील अंजूरफाटा येथील राहणाऱ्या सामाजीक कार्यकर्त्या उषा (नांव बदलले)यांच्याशी संपर्क करून त्यांच्या दोन्ही मुलींना लग्नाची मागणी घातली. मुलींना पसंतीनंतर लग्नासाठी हुंडा म्हणून एका मुलास एक लाख ५१ हजार रूपये व पाच तोळे सोने अशी मागणी करून साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात ३ जानेवारी १९ रोजी पार पाडला. त्यानंतर या कुटूंबाने उषा यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून त्यांच्याकडे येणेजाणे सुरू केले.दरम्यान दोन्हीं मुलींचे आपल्या भावी पतींसोबत मोबाईलवर बोलणे सुरू झाले होते. मात्र अचानकपणे उषा यांना बाळासाहेब दबडे याने तुमची मुलगी माझा मुलगा गणेश यास पसंत नाही असे सांगून त्यांनी लग्नास नकार दिला.त्यामुळे मानसीक धक्का असह्य झाल्याने उषाच्या कुटूंबाने दबडे कुटुंबीयांची माहिती काढली. त्यानुसार गणेश दबडे याचे वर्षभरापूर्वी मिरज येथील एका मुलीशी लग्न झाल्याचे समजले. ही माहिती मिळाल्यानंतर उषाचे कुटूंबांनी दबडे यांच्या घरी जाऊन जाब विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.दरम्यान लहान मुलीला दबडे कुटूंबाने लग्न मोडल्याचे सांगितले त्यामुळे तीला मानसिक धक्का सहन न झाल्याने तीने १८ फेब्रुवारी रोजी रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा गंभीर प्रकार असल्याचे उषा यांनी तातडीने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेवून दबडे कुटुंबीयांच्या विरोधात विश्वासघात व फसवणूकीबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करून दबडे कुटूंबातील गणेश ,विकास ,वनिता ,बाळासाहेब दबडे यांना तात्काळ अटक करून आज शुक्रवार रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन करीत आहे.