अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी दोघा भावांना तीन वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 05:44 AM2019-12-28T05:44:38+5:302019-12-28T05:44:47+5:30
न्यायालयाचा निकाल : अॅट्रॉसिटीअंतर्गत शिक्षा
ठाणे : दूध आणण्यासाठी गेलेल्या दहावीतील अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात विनयभंग करून तिला व तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इंद्रसेन ऊर्फ बंटी रमेश ठाकरे (२४) आणि त्याचा भाऊ चेतन (२२) या दोघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश जी.पी. शिरसाट यांनी दोषी ठरवून शुक्रवारी तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच या भावांना एक वर्षाची शिक्षाही झाल्याची माहिती सरकारी वकील रेखा हिरवाळे यांनी दिली. हा प्रकार गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडीनाका येथे ६ डिसेंबर २०१३ रोजी घडला होता.
पीडित १६ वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शाळेतून घरी आली. तिच्या आईने तिला नाक्यावरून चहा करण्यासाठी दूध आणण्यास सांगितले. ती घरातून पैसे घेऊन अंबाडीनाका येथून दूध घेऊन घरी परतत होती. त्यावेळी आरोपी त्याच परिसरात रस्त्याच्या कडेला हातामध्ये विळा घेऊन गवत कापत होते. त्यांनी तिला पाहून तिच्याजवळ गेल्यावर इंद्रसेन याने तू माझ्याशी मैत्री करते का, असे विचारले. तेव्हा तिने त्याला विरोध केल्यावर त्याने तिचा हात पकडला. तर, चेतन याने तिची ओढणी खेचून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. ७ डिसेंबर रोजी याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात विनयभंग, पॉक्सो तसेच अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. हा खटला ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश शिरसाट यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील रेखा हिरवाळे यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद आणि सात साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून त्या भावांना विनयभंग आणि पॉक्सो अॅक्टनुसार प्रत्येकी तीन वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंड तसेच अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार एक वर्ष कारावास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.