म्हाडाच्या दोन इमारती कोसळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:09 AM2017-07-20T04:09:10+5:302017-07-20T04:09:10+5:30
महाराष्ट्रनगर भागात असलेल्या म्हाडाच्या दोन धोकादायक चार इमारती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. या इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्याने कोणतीही
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्रनगर भागात असलेल्या म्हाडाच्या दोन धोकादायक चार इमारती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. या इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्याने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव बाजूची इमारतदेखील रिकामी केली आहे. त्यामध्ये २० कुटुंबांना इतरत्र हलवण्यात आले आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मागील बाजूस महाराष्ट्रनगर परिसर आहे. या भागात सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हाडाने १८ इमारती बांधल्या होत्या. त्यातील बहुतेक इमारती धोकादायक झाल्याने म्हाडाची ही संपूर्ण वसाहत पुनर्विकासासाठी विकासकाकडे देण्यात आली आहे. यातील बहुतांश इमारती धोकादायक झाल्याने त्या रिकाम्या केल्या आहेत. त्यातीलच ४ आणि ५ क्रमांकांच्या दोन इमारती बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कोसळल्या. पण तेथे कोणी रहात नव्हते. पालिकेचा आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल व म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीदेखील घटनास्थळी जाऊन ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. दरम्यान, म्हाडाच्या जुन्या झालेल्या १८ इमारतींचा पुनर्विकास होणार असल्याने तेथे राहणाऱ्या रहिवाशांना विकासकाने अन्यत्र जागा दिली होती. यातील काहींना भाडेदेखील दिले आहे. तरीही, सात खोल्या भाड्याने राहण्यासाठी दिल्या होत्या. तर, ११ खोल्यांमध्ये कुटुंबे होती. चार व पाच क्र मांकाची इमारत कोसळल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या निवाऱ्याची इतरत्र व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे इमारत धोकादायक असूनही तेथे लोक कसे राहत होते, याची चौकशी म्हाडाचे अधिकारी करीत आहेत.