उल्हासनगरात झाड पडण्याच्या दोन घटना! एकूण २ कार अन् ३ रिक्षांचे झाले मोठे नुकसान
By सदानंद नाईक | Published: July 1, 2024 07:52 PM2024-07-01T19:52:32+5:302024-07-01T19:52:49+5:30
मोठी घटना घडण्यापूर्वी जुन्या, धोकादायक झाडांवर कारवाई करण्याची मागणी
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहर पूर्वेतील अंबिकानगर व हिललाईन पोलीस स्टेशन जवळ जुने दोन झाडे पडून ३ रिक्षा व २ कारचे नुकसान झाले. पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे बाजूला केली असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील अंबिका चौकात दुपारी जुने झाड कार व दोन रिक्षावर पडून त्यांचे नुकसान झाले. या झाडाची काहीकाळ वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. अग्निशमन दलाच्या विभागाने घटनेस्थळी धाव घेऊन पडलेले झाड बाजूला केले. तर झाड पडण्याची दुसरी घटना हिललाईन पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस घडली. हे झाड कार व रिक्षावर पडल्याने, कार व रिक्षाचे नुकसान झाले. झाड पडण्याच्या दोन्ही घटनेत कोणीही जखमी झाले नसली तरी ३ रिक्षा व २ कारचे नुकसान झाले.
महापालिकेने मोठी घटना घडण्यापूर्वी जुने व धोकादायक झाडे यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. झाडे सर्वेक्षणात किती झाडे धोकादायक आहेत. त्याची यादीही प्रसिद्ध करण्याची मागणी होत आहे.