ठाण्यात होणार मेट्रोचे दोन कास्टिंग यार्ड; एमएमआरडीएसमोर भूसंपादनाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:19 AM2018-07-05T02:19:23+5:302018-07-05T02:19:40+5:30
जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे करण्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
- नारायण जाधव
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे करण्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यासाठी लागणाºया जमिनीच्या भूसंपादनासह विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएच काम पाहणार आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार कोपरीतील कास्टिंग यार्डसाठी २६.८८ हेक्टर, तर कावेसर येथील कास्टिंग यार्डसाठी ९.६४ हेक्टर जमीन लागणार आहे. मात्र, यापूर्वी कासारवडवली आणि गायमुख येथील मेट्रोच्या कारशेडला आमदार प्रताप सरनाईकांसह स्थानिकांचा मोठा विरोध झाला होता. त्यामुळे या दोन्ही कास्टिंग यार्डची जमीन संपादित करण्याचे मोठे आव्हान एमएमआरडीएसमोर राहणार आहे.
वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ आणि ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ चे एकत्रीकरण करून विस्तारित ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमीच्या मेट्रोमार्गाचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्पास आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मेसर्स डापोलोनिया एसपीए आणि मेसर्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या सल्लागारांनी या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यानुसार, या मार्गासाठी त्यांनी सुमारे ८४१६ कोटी ५१ लाख इतका खर्च प्रस्तावित केला आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान या मार्गावर १७ स्थानके प्रस्तावित असून या मार्गावर सुरुवातीला पाच मिनिटांच्या अंतराने, तर नंतर चार मिनिटांनी मेट्रो धावेल, असे सूचित केले आहे. यासाठी मार्च २०२१ ही डेडलाइन दिली आहे. त्यादृष्टीने आता ठाणे शहरातच दोन ठिकाणी तिचे कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार आहे.
ठाणे पालिकेचे अधिकार काढले
कोपरीतील सर्व्हे क्र. ८६ व कावेसरमधील सर्व्हे क्रमांक ३११ ते ३१३ येथे ही कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी या भागात सध्या नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहत असलेल्या ठाणे महापालिकेचे अधिकार काढून ते एमएमआरडीएला बहाल केले आहेत.
- यापूर्वी गेल्या आठवड्यात या मार्गावरील मेट्रो स्थानकांचे डिझाइन तसेच कारशेडची रचना कशी असावी हे ठरविण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रि या सुरू केली आहे. यासंबंधीची निविदा मागविण्यात आली असून येत्या दोन महिन्यांत सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. मेट्रो-५ वेळेत पूर्ण व्हावा, म्हणून त्याचा निकडीच्या प्रकल्पात समावेश केला असून यामुळे सर्व शासकीय आणि पर्यावरण, वन खात्याच्या परवानग्यांसह जमीन संपादित करावी लागणार आहे.
सीआरझेडचा अडथळा येणार
कोपरी सीआरझेडमध्ये मोडते. तो अडथळा पार करण्यास मेट्रोला केंद्राचे उंबरठे झिझवावे लागतील. कावेसरच्या वनजमीनीसाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागेल.
नियोजित स्थानके
कापूरबावडी, कशेळी, बाळकुमनाका, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकरनाका, भिवंडी, गोपालनगर, टेमघर, राजनोली, गोवे एमआयडीसी, कोन, दुर्गाडी, सहजानंद चौक, कल्याण स्टेशन, कल्याण एपीएमसी.
मार्गाची वैशिष्ट्ये
मार्गाची लांबी : २४.९ किमी
प्रस्तावित कारडेपो : १५ हेक्टर, कोनगाव
इतर लागणारी जमीन : ३.२५ हेक्टर
तात्पुरती लागणारी जमीन : ६ हेक्टर
प्रकल्प कालावधी : ४१ महिने
जमिनीशिवाय मूळ किंमत : ५१९७.५० कोटी
जमिनीची किंमत : ११२.५२ कोटी
आकस्मिक खर्च : ३.३८ कोटी
राज्य शासनाचा कर : ७१६.४६ कोटी
केंद्र शासनाचा कर : ५९२.३८ कोटी
दरवाढ : १७७४.२८ कोटी
बांधकामादरम्यानचे व्याज : २० कोटी
एकूण किंमत : ८४१६.५१ कोटी