बतावणी करीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघांना दक्ष नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:16 PM2018-12-10T22:16:29+5:302018-12-10T22:23:27+5:30
वेगवेगळी बतावणी करीत दागिने लुबाडणा-या ठकसेनांच्या टोळीपैकी गुजरातच्या अर्जून सलाट आणि अर्जूनभाई मारवाडी या दोन भामटयांना दक्ष नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
ठाणे: बतावणी करीत भारत राठोड (२१, रा. घणसोली, नवी मुंबई) या तरुणाकडील ८२ हजारांची सोनसाखळी हिसकावणा-या गुजरातच्या अर्जून सलाट (२५) आणि अर्जूनभाई मारवाडी (२२) या दोघांना दक्ष नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून २६ ग्रॅम वजनाची सोनसाखळीही हस्तगत करण्यात आली आहे. या दोघांनाही १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मासुंदा तलावाजवळील दुय्यम निबंध कार्यालयाजवळून राठोड हे ९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास पायी जात होते. त्यावेळी सलाट आणि मारवाडी या दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकावून तिथून पळ काढला. हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करुन या दोघांनाही नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अटक केली. यातील सलाट हा गुजरातच्या सर्वोदयनगर, मालपूर रोड, ता. मोंडासा येथील रहिवाशी असून मारवाडी हा साबरकाटा जिल्हयातील हिंमतनगर (गुजरात) येथील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून सोनसाखळीसह पाचशे रुपये दराच्या नोटा दोन्ही बाजूंना लावलेले नोटांच्या आकाराचे कागदाचे बंडल आणि दीड हजार हजार रुपये असा ८३ हजार ५०० चा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांनी गुजरातमधून महाराष्टÑात येऊन असे अनेक प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.