दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू
By admin | Published: April 10, 2017 04:13 AM2017-04-10T04:13:37+5:302017-04-10T04:13:37+5:30
ठाणे : पोहता न आल्याने मुलुंडमधील दोन अल्पवयीन मुलांचा ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात बुडून मृत्यू
ठाणे : पोहता न आल्याने मुलुंडमधील दोन अल्पवयीन मुलांचा ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, ही घटना पाहणाऱ्या त्यांच्या सवंगड्यांनी मात्र भीतीने तिथून धूम ठोकली. त्यांच्या या साथीदारांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यश रवी खरात (१०) आणि प्रज्ञेश सचिन शिंदे (१५) रा. अशोकनगर, मुलुंड अशी तलावात बुडालेल्यांची नावे आहेत. दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हे दोघे आणि त्यांचे आणखी तीन साथीदार असे पाच जण पोहण्यासाठी उतरले होते. यश आणि प्रज्ञेश यांच्यापैकी एकाला पाण्याचा नेमका अंदाज न आल्याने एक जण गटांगळ्या खात असल्याचे दुसऱ्याने पाहिले. दोघे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात खोल पाण्यात बुडाले. आरडाओरडा ऐकून स्थानिक रहिवासी आेंकार पाटील हे बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले, परंतु नेमकी कोणत्या ठिकाणी ते बुडाले, याचा त्यांनाही अंदाज न आल्याने, त्यांनी अखेर अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केले. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने अग्निशमन दलाच्या मदतीने या दोघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढले. ठाण्याच्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सीताराम वाघ यांनी दिली. (प्रतिनिधी)
मुरूडमध्ये पर्यटकाचा बुडून मृत्यू
काशीद समुद्रकिनारा पाहण्यासाठी ४३ जणांचा समूह काशीद ग्रामपंचायत हद्दीमधील सर्वे गावात उतरला होता. रविवारी चिकणी समुद्रकिनारी यातील १६ जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. सकाळी १० वाजता भरतीची वेळ असताना समुद्रात उतरलेले काही लोक पोहता पोहता खोल समुद्रात गेले, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर परत येणे त्यांना कठीण झाले. यातील तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले, तर एकाचा मृत्यू झाला.
मयूर भिलारे (२१) असे मृत तरु णाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड येथील जेडी ग्रुप कंपनीतील ४० लोकांचा समूह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आला होता. शनिवारी या सर्वांनी सर्वे येथे वस्ती करून रविवारी यातील १६ जण चिकणी समुद्रकिनारी पोहावयास गेले होते.
सकाळी १० वाजता भरतीची वेळ असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने यातील तिघे जण पाण्यात ओढले गेले. किनाऱ्यापासून दूरवर गेल्याने आपल्या बचावासाठी त्यांनी आरडाओरडा केला.
स्पीडबोटीच्या साहाय्याने सचिन चंडालिया ( २५) व नीलेश बर्गे (२८) यांना वाचवण्यात यश आले; परंतु मयूर भिलारे याला वाचवण्यात अपयश आले. खूप दूरवर निघून गेल्याने त्याचा मृतदेह सापडू शकला नाही. अखेर कोस्टल गार्डच्या मदतीने हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली व अर्ध्या तासाच्या आतच त्यांनी हा मृतदेह शोधून काढला. पाण्यातून बचावलेल्या सर्वांना त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली.