भिवंडीतील वऱ्हाळ तलावात बुडून दोन बालकांचा मृत्यू, परिसरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 09:07 PM2022-04-10T21:07:00+5:302022-04-10T21:07:06+5:30
दुपारी दोन तासांच्या शोधमोहिमेत अमन चौऊस याचा मृतदेह हाती लागला तर रात्री आठ वाजता अमान अन्सारी याचा मृतदेह सापडला.
भिवंडी: भिवंडी शहरातील वऱ्हाळ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. अमन आरिफ चौऊस वय १३ व अमान सरफराज अन्सारी वय १५ असे पाण्यात बुडवून मृत्यू पावलेल्या बालकांची नावे आहेत.
सध्या उष्णतेचा कहर असताना भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड अमन आरिफ चौऊस व अमान सरफराज खान हे दोघे आपल्या इतर चार मित्रांसह कामतघर वऱ्हाळ तलाव येथे दुपारी तीन वाजता फिरत फिरत आले. त्यानंतर अमन आरिफ चौऊस व अमान सरफराज खान असे दोघे पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता ते दोघे बुडू लागताच त्यांच्या सोबत आलेले चार मित्रांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. स्थानिकांनी या घटनेची महिती पोलिसांसह अग्निशामक दलास दिली असता अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सुरू केली.
दोन तासांच्या शोधमोहिमेत अमन चौऊस याचा मृतदेह हाती लागला .त्या नंतर अंधार पडू लागल्याने शोध थांबवित असताना रात्री ८ वाजता अमान अन्सारी याचा मृतदेह हाती लागला आहे. स्थानिक शहर पोलीस ठाण्यात या बाबत अपघात मृत्यूची नोंद करीत दोन्ही मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले आहेत.ऐन रमजान महिन्यात दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडवून दुदैवी मृत्यू झाल्याने पटेल कंपाऊंड परिसरात शोककळा पसरली आहे. तर वऱ्हाळ देवी तलाव परिसरात सुरक्षेच्या साधनांचा व सुरक्षा रक्षकांचा अभाव असल्याने मनपाच्या नाकर्तेपणा व दुर्लक्षित कारभारामुळे या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.