जिवाची मुंबई करण्यासाठी पुण्यातून पळालेली दोन मुले मिळाली ठाण्यात
By जितेंद्र कालेकर | Published: November 29, 2023 08:32 PM2023-11-29T20:32:07+5:302023-11-29T20:34:38+5:30
नौपाडा पोलिसांच्या सर्तकतेमुळे पुन्हा आई वडिलांच्या स्वाधीन
ठाणे: मुंबईची जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया आणि आणखी बरेच काही पाहण्यासाठी पुण्याच्या कात्रज गावातून पळालेली १२ आणि १३ वर्षांची दोन मुले ठाण्याच्या नौपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे बुधवारी पुन्हा आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली. आपली मुले सुखरुप मिळाल्यामुळे ठाणे पोलिसांचे या पालकांनी आभार मानले आहेत.
पुणे जिल्हयातील कात्रज गावात राहणाऱ्या दोन मित्रांना चित्रपटांमुळे तसेच काही नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीमुळे मुंबई पाहण्याचे वेध लागले होते. परंतू, दोषांनाही आपआपल्या घरातून परवानगी मिळणार नसल्याची कल्पना आल्यामुळे दोघांनीही आपल्या आई वडिलांना काहीच कल्पना न देता घर सोडण्याचे ठरवले. त्याप्रमाणे २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्याा सुमारास त्यांनी लोणी गावातून पुण्याचे स्वारगेट गाठले. तिथून स्वारगेट - ठाणे एसटी बसने हे दोघेही ठाण्यात रात्रीच्या सुमारास आले.
ठाण्याच्या वंदना बस स्थानकातून २९ नोव्हेंबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास एका रिक्षा चालकाला त्यांनी मुंबईच्या जुहू चौपाटीवर जायचे असल्याचे सांगितले. त्यांची रिक्षा चालकाबरोबर चर्चा सुरु असतांनाच नौपाडा पोलिस ठाण्याचे बीट मार्शल विनोद पाटील हे गस्त घालतांना तिथे पाेहचले. चौकशीत हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या पालकांचा संपर्क क्रमांक घेण्यात आला. तेंव्हा त्यांच्यापैकी एकाच्या आईने ही दोन्ही मुले मंगळवारपासून बेपत्ता झाल्याचे सांगितले. मुलांची ओळख पटल्यानंतर दोघांच्याही पालकांना पोलिसांनी ठाण्यात पाचारण केले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे आणि हवालदार पाटील यांनी या दोन्ही मुलांना दाेघांच्याही वडिलांकडे सुखरुप ताब्यात दिले. विशेष म्हणजे ही दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची कोणतीच तक्रार पुण्याच्या पोलिसांकडेही नव्हती. परंतू, ठाणे पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे आपली मुले सुखरुप परत मिळाल्यामुळे दोघांच्याही पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.