टेम्पोच्या धडकेत दोन मुले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:50 AM2019-01-20T04:50:40+5:302019-01-20T04:50:44+5:30
टेम्पोच्या धडकेत दोन शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ठाण्याच्या राबोडीतील सरस्वती स्कूल परिसरात घडली.
ठाणे : टेम्पोच्या धडकेत दोन शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ठाण्याच्या राबोडीतील सरस्वती स्कूल परिसरात घडली. या प्रकरणी फरार टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कनक जोशी (१०) आणि वेद काटे (१०) अशी मुलांची नावे असून ती पारसिकनगर, खारेगाव येथे राहतात. ते राबोडी सरस्वती स्कूलचे पाचवी-सहावीतील विद्यार्थी आहेत. शाळेच्या परिसरात राहणारा जुमेन खान (१५) हा भावाच्या टेम्पोची साफसफाई करत होता. त्याच्याकडून चुकून टेम्पो चालू झाला. त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने तो त्या परिसरात उभ्या असलेल्या स्कूलबस आणि टेम्पोला जाऊन धडकला. कनक आणि वेद याना त्याची धडक बसल्याने ते जमिनीवर पडले. यांच्या हातापायाला जखम झाल्याने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.