भिवंडी येथे अपघातात दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू
By नितीन पंडित | Published: February 11, 2023 04:28 PM2023-02-11T16:28:57+5:302023-02-11T16:29:15+5:30
एक शाळेत जाताना, तर दुसरा शाळेतून घरी येताना घडली दुर्घटना
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यात शाळेत जाताना व शाळेतून घरी आपल्या पालकांसोबत दुचाकी वरून परतणाऱ्या दोघा शाळकरी चिमुकल्यांना वाहन अपघातात मृत्यू झाल्याच्या दोन दुर्दैवी घटना शुक्रवारी घडल्या आहे.या दोन्ही दुर्दैवी घटनांनी परिसरात शोककळा पसरली आहे.
पहिल्या घटनेत काल्हेर येथील माधाव पार्क मध्ये राहणारे रावसाहेब खेडकर आपल्या दुचाकीवरून पत्नी व मुलगी आदिती यांसह पाच वर्षीय मुलगा शौर्य यास कोपरगाव येथील परशुराम टावरे विद्यालय संकुलातील शाळेत दुपारी बारा वाजता सोडण्यासाठी जात होते.वाहतूक कोंडीमुळे शाळेच्या गेट समोरून जात असताना तेथील वाहतूक कोंडीत थांबलेला आयशर टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पोची दुचाकीस ठोकर दिली.त्यामध्ये मोटारसायकलचा तोल जावून मुलगा शौर्य हा डावीकडे टेम्पोच्या समोर पडला व त्याचवेळी टेम्पोचे डावीकडील चाक चिमुरड्याच्या डोक्यावरून गेल्याने त्यास गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये शौर्य याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या दुर्घटने प्रकरणी टेम्पो चालक नागेश लक्ष्मण कामतेकर याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे.
दुसऱ्या घटनेत मानकोली लोढा अप्पर ठाणे गृहसंकुल इमारतीमध्ये राहणारे धर्मेंद्र देबाता यांच्या पत्नी डॉ मालविका देबाता या घोडबंदर रोड वरील सेंट झेवीयर्स शाळेत शिकणाऱ्या अकरा वर्षीय प्रणव या मुलास शुक्रवारी आपल्या ऍक्टिव्हा दुचाकी वरून दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घरी येत होत्या.मानकोली अलीमघर या रस्त्याने अवघ्या काही अंतरावर घर राहिले असताना पाठी मागून आलेल्या सिमेंट मिक्सर चालकाने मोटर सायकलीस कट मारल्याने दुचाकीस सिमेंट मिक्सर वाहनांचा धक्का लागला.त्यामध्ये महिला चालक डाव्या बाजुला दुचाकी सह पडली तर त्याच वेळी अकरा वर्षीय प्रणव हा रस्त्याच्या बाजूला पडल्याने त्याच्या डोक्या वरून सिमेंट मिक्सर वाहनांचे मागील चाक जाऊन त्याचा मृत्यू झाला.या दुर्घटने नंतर मिक्सर चालक त्या ठिकाणाहून पसार झाला असून या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.